Uddhav Thackeray sarkarnama
विदर्भ

Uddhav Thackeray : ठाकरे सेना विदर्भातून विधानपरिषदेवर कोणाला संधी देणार?

Maharashtra Legislative Assembly Election 2024 : विधान परिषदेवर पाठवण्यासाठी उद्वव सेना यांच्याकडे पुरेसे आमदार नाही. त्यांचे चाळीस आमदार शिंदे सेनेत सहभागी झाले आहेत.

Rajesh Charpe

Nagpur Political News : शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत टोकाचे मतभेद झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यावेळी विधान परिषदेवर विदर्भातील नेत्याला पाठवण्याचे जाहीर केले आहे.

विधानपरिषद निवडणूक जाहीर होताच इच्छुकांच्या संख्येत सतत भर पडत आहे. तरी, ठाकरे यांनी अद्याप कोणालाच स्पष्ट संकेत दिले नाहीत. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या आमदार मनिषा कायंदे आणि अनिल परब (Anil Parab) यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपत आला आहे. रिक्त होणाऱ्या एकूण 11 जागांसाठी निवडून जाहीर झाली आहे. अनिल परब मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आहेत.

मनिषा कायंदे या आता शिंदे सेनेत सहभागी झाल्या आहेत. विधान परिषदेवर पाठवण्यासाठी उद्वव सेना यांच्याकडे पुरेसे आमदार नाही. त्यांचे चाळीस आमदार शिंदे सेनेत सहभागी झाले आहेत. हे बघता त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात घ्यावे लागणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हेसुद्धा 40 आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा करीत आहेत. प्रत्यक्षात खरा आकडा दोन्ही राष्ट्रवादीला जाहीर करता आला नाही. शेकापचे जयंत पाटील यांचाही कार्यकाळ संपत आला आहे.

ते शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संपर्कात आहेत. शिवसेनेने नेहमीच विधान परिषदेसाठी मुंबई आणि कोकणाला प्राधान्य दिले आहे. हे बघता विदर्भाला संधी मिळेल की नाही याची कोणालाच शाश्वती नाही.

महाविकास आघाडीचे सरकार पाडल्याने आणि शिवसेनेला फोडल्याने उद्वव ठाकरे यांचा सर्वाधिक राग देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आहे. महायुतीला पराभूत करण्यासाठी याकरिताच शिवसनेने रामटेक लोकसभा काँग्रेससाठी सोडली आहे.

भाजपमुळेच विदर्भातून शिवसेना कमजोर झाल्याचा त्यांचा आरोप आहे. विदर्भात अधिक लक्ष देण्याचे उद्धव ठाकरे यांनी ठरवले आहे. विधान परिषदेवर विदर्भातून प्रतिनिधी पाठवून याची सुरुवात केली जाणार आहे.

माजी खासदार जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, पूर्व विदर्भाचे सह संघटक सतीश हरडे, सुधीर सूर्यवंशी यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. पदाधिकाऱ्यांच्या भाऊगर्दीत जयदीप पेंडके यांचे नाव आश्चर्यकारकरित्या समोर आले आहे.

ते पदाधिकारी नसले तरी पडद्यामागून सर्व कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. मुंबईतील सर्वच नेत्यांच्या ते संपर्कात असतात. संजय राऊत यांच्या बैठकांमध्ये ते प्रामुख्याने दिसतात. जाधव आणि हरडे यांना विधान सभेची निवडणूक लढण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पेंडके शेवटच्याक्षणी बाजी मारू शकतात असे अनेकांचे म्हणणे आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT