Akola Shivsena Hunger Strike Sarkarnama
विदर्भ

Akola Shivsena : अकोल्यात ठाकरे सेनेचा महावितरणला शॉक

जयेश विनायकराव गावंडे

Protest For Farmer : पीकविम्याच्या मागणीवरून अकोला प्रशासनाला जेरीस आणणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आता महावितरणच्या विरोधात दंड थोपटलंय. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. या आंदोलनात शेतकऱ्यांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आंदोलनाची मालिकाच सुरू केलीय. पीकविम्यावरून प्रशासनाविरोधात आंदोलन केल्यानंतर जिल्ह्यातील अकोला, पातूर आणि अकोट मध्ये पीकविमा कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय. (Shivsena Uddhav Thackeray Group on Hunger Strike in Akola District for Farmer's Against MSEDCL)

ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आमदार नितीन देशमुख आणि जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वात सध्या आंदोलनांची ही मालिका सुरू झाली. वेगवेगळ्या माध्यमांतून प्रशासनासह सरकारला घेरण्याचा सपाटाच त्यांनी लावलाय. शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाविरुद्ध आता महावितरणबद्दल शिवसेना आंदोलनात्मक भूमिकेत आली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरणकडून त्रास होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

मूर्तिजापूरच्या महावितरणकडून तालुक्यातील शेतकऱ्यांना विनाकारण मानसिक त्रास देण्यात येतोय. वीजबिलाचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यावर लादण्यात येतोय. कृषिपंपांची जोडणी प्रलंबित आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. यासंदर्भात वारंवार चर्चा केल्यानंतरही दुर्लक्ष होत असल्यानं आता उपोषण सुरू करण्यात आलय. तालुक्यातील शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा, जळालेले रोहित्र कोणतेही शुल्क अथवा वीजबिल न भरून घेता बदलण्यात यावे, व्होल्टेजचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. तालुका प्रमुख अप्पू तिडके, विधानसभा संघटक गोपाल भटकर, उपसभापती देवशिष भटकर, शेतकरी सेनेचे तालुका संघटक रूपेश कडू आदी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंदोलकांना अद्याप महावितरण अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळं उपोषण करणाऱ्यांसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पारा आता चढण्यास सुरुवात झालीय. अशात कोणत्याही क्षणी आंदोलकांच्या संयमाचा बांध फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पीकविम्याच्या मुद्द्यावर बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात दोन ठिकाणी तोडफाेड केली होती. त्यामुळं प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली होती. आता मूर्तिजापूर तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाचा धसकाही प्रशसानानं घेतलाय. महावितरण कार्यालयाच्या परिसरातील पोलिस बंदोबस्त व खासगी सुरक्षारक्षकांच्या संख्येतही वाढ करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस आंदोलकांवर लक्ष ठेवून आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT