Shyamkumar Barve Sarkarnama
विदर्भ

Shyam Barve : लोकसभेनंतर श्याम बर्वेंचं एकच मिशन; विधानभसेत थेट भाजपलाच टशन!

Ramtek Congress Vs BJP : रश्मी बर्वे लढू नये याकरिता आधीपासूनच भाजपच्या कुरापती सुरू होत्या. रात्री तीन वाजता नोटीस बजावली तेव्हाच काही तरी गडबड होणार याची कल्पना आली होती.

Rajesh Charpe

Nagpur Political News : आमचे नेते व राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांना दिलेला त्रास आणि सत्तेचा दुरूपयोग करून पत्नीची रद्द केलेली लोकसभेची उमेदवारी रामटेकची जनता विसरली नाही.

लोकसभेत आम्ही महायुतीचा पराभव केला. आता विधानसभेत सर्व सहा मतदारसंघातून भाजपला हद्दपार कराण्याचा आमचा संकल्प असल्याचे सांगून रामटेकचे नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांनी भाजपला खुले आव्हान दिले.

लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी रामटेक मतदारसंघात Ramtek अनेक राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे त्यांना लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली.

काँग्रेसने त्यांच्याऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवार केले. त्यांनी महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना पराभूत करून भाजपच्या बड्या नेत्यांना मोठा धक्का दिला. या सर्व घडामोडींवर खासदार बर्वे यांनी आज भाष्य केले. ते म्हणाले, रश्मी बर्वे लढू नये याकरिता आधीपासूनच भाजपच्या कुरापती सुरू होत्या. रात्री तीन वाजता नोटीस बजावली तेव्हाच काही तरी गडबड होणार याची कल्पना आली होती.

भाजपचा डाव हेरून सुनील केदार Sunil Kedar यांनी आठ दिवसांपूर्वीच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारे कागपत्रे व ना हरकत प्रमाणपत्र तयार करून ठेवण्यास सांगितले होते. काँग्रेस नेते व राष्ट्रीय सरचिटणीस वेणुगोपाल यांनाही याची कल्पना दिली होती. त्यांच्याकडून कोरा एबी फॉर्म मागवून घेतला होता.

आमची शंका खरी ठरली. आपल्या पराभवासाठी भाजप काय काय करू शकते याची खडानखडा माहिती केदार यांना होती. प्रत्येक बुथवर बसणाऱ्या कार्यकर्त्याला ‘१७ सी‘ प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे ईव्हीएमसुद्धा कोणाला गडबड करता आली नसल्याने बर्वे यांनी सांगितले.

आता लोकसभेच्या विजयाचे रुपांतर रामटेकमध्ये येणाऱ्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघात करायचा निर्धार काँग्रेसने केला आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही आम्ही यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपने ज्या पद्धतीने रश्मी बर्वे यांना नोटीस पाठवल्या, एका महिलेला निवडणूक लढण्यापासून वंचित ठेवले त्याचीसुद्धा सहानुभूती निवडणुकीत मिळाली असल्याचे खा. बर्वे यांनी प्रांजळपणे कबूल केले.

पंधरा वर्षे ग्राम पंचायतमध्ये काम करण्याचा अनुभव पाठिशी होता. रश्मी बर्वे अध्यक्ष असल्याने जिल्हा परिषदेचे सभागृहाचे कामकाज जवळून बघता आले. संसदेत खासदारांची संख्या अधिक आहे. त्यापेक्षा ग्रामपंचयात फारकाही वेगळी नाही. 12 ऑगस्टला देशाचा अर्थसंकल्प सादर होईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या कामाला सुरुवात होईल असे खा. बर्वे यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT