Chandrapur Headmistress Suspended AI
विदर्भ

Chandrapur News: SIR मोहिमेत मोठी कारवाई! BLO म्हणून कार्यरत मुख्याध्यापिका निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Chandrapur Headmistress Suspended: SIR मोहिमेतील मतदारयादीच्या कामात कथित हलगर्जीपणाचा ठपका ठेवत चंद्रपूरमधील मुख्याध्यापिका छाया माणिक खुणे यांना निलंबित करण्यात आले. या कारवाईनंतर शिक्षक संघटनांमध्ये संतापाची लाट.

Mangesh Mahale

SIR Campaign Maharashtra: महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदारयादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेमुळे शिक्षकांवरील ताण दिवसेंदिवस वाढत असताना आता चंद्रपूर जिल्ह्यात एका मुख्याध्यापिकेवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मतदारयादीच्या कामात हयगय, टाळाटाळ आणि निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगाण (ता. ब्रम्हपुरी) येथील मुख्याध्यापिका छाया माणिक खुणे यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात SIR मोहिमेच्या कामामुळे शिक्षकांवर मोठा ताण असल्याची चर्चा सुरू असतानाच ही कारवाई झाल्याने शिक्षक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका शिक्षिकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, तर वर्धा जिल्ह्यात SIR कामाच्या तणावात एका शिक्षिकेचा अपघात झाला. आता थेट निलंबनाची कारवाई झाल्याने शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मतदारयादीच्या कामात टाळाटाळ

छाया माणिक खुणे यांची ब्रम्हपुरी तालुक्यातील मतदान केंद्र क्रमांक ५५ साठी बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यावर मतदारयादीची तयारी, पुर्नरावलोकन, दुरुस्ती करणे तसेच पात्र मतदारांची नावे समाविष्ट करणे किंवा अपात्र नावे वगळणे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती.मात्र, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यांनी कामात अपेक्षित प्रगती केली नाही. तसेच नेमून दिलेल्या जबाबदारीत जाणीवपूर्वक हयगय, टाळाटाळ आणि निष्काळजीपणा केल्याचे निष्पन्न झाल्याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे.

लोकप्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत निलंबन

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम 13(AA) तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदींचा वापर करून खुणे यांना तात्काळ निलंबित केले आहे. त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मुख्यालय सोडण्यास बंदी

निलंबनाच्या कालावधीत खुणे यांचे मुख्यालय निश्चित करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना देण्यात आले आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय निलंबनाच्या काळात कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. तसे केल्यास त्यांच्यावर गैरवर्तनाची स्वतंत्र कारवाई करण्यात येईल आणि निर्वाह भत्त्याचाही हक्क गमवावा लागू शकतो, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

राज्यभरात वाढते दडपण

निवडणूक आयोगाने SIR मोहिमेचे काम निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शिक्षकांना दिवसभर शाळेची जबाबदारी पार पाडल्यानंतर घरोघरी जाऊन मतदार पडताळणी करावी लागत आहे. आषाढी वारी, शेतीची कामे, नागरिकांची अनुपस्थिती आणि वारंवार बदलणाऱ्या सूचनांमुळे काम अधिकच कठीण झाले असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.अशा परिस्थितीत चंद्रपूरमधील निलंबनाची कारवाई शिक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरली असून, SIR मोहिमेतील वाढत्या दबावामुळे प्रशासन आणि शिक्षक संघटनांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT