Protest During Infront of Ajit Pawar in Bhandara. Sarkarnama
विदर्भ

Bhandara News : गोसीखुर्द प्रकल्पाबद्दल अजितदादांनी बोलणं सुरू करताच घोषणाबाजीचा ‘प्रहार’

Shashan Aaplya Dari : पोलिसांची व्यूहरचना मोडत आंदोलकानं अखेर गोंधळ घातलाच

अभिजीत घोरमारे

Ajit Pawar Speach : ‘शासन आपल्या दारी’च्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (ता. २०) भंडारा दौऱ्यावर होते. राज्यातील तीनही मोठे मंत्री गावात असल्यानं पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी व्यापक व्यूहरचना केली होती. काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यासह आंदोलन करण्याची शक्यता असलेल्या सर्वच नेत्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं होतं. परंतु पोलिसांना हुलकावणी देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण सुरू असताना घोषणाबाजी झालीच. त्यामुळं बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांची चांगलीच धावपळ झाली.

भंडारा येथे कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण देण्यासाठी व्यासपीठावर उभे झाले. एक एक करीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर संवाद साधला. परंतु गोसीखुर्द प्रकल्पाबाबत त्यांनी बोलणं सुरू करताच सभामंडपात घोषणाबाजीला सुरुवात झाली आणि गोंधळ उडाला. (Slogans While Deputy Chief Minister Ajit Pawar Speech At Bhandara By Gosikhurd Project Affected Person)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलक प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील प्रहार गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचा सदस्य आहे. वसंत पडोळे असं त्याचं नाव आहे. सभास्थळी तो आंदोलन करण्याच्या तयारीनेच आला होता. त्याच्या सोबत आणखी कुणी होते का याचा शोध घेण्यात येत आहे.

पवारांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजीनंतर प्रहार संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना अजित पवार यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. गोसीखुर्द प्रकल्पावरून भाजपनं अजित पवार यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला होता. आता तेच लोक पवारांना सत्तेच्या खुर्चीवर घेऊन बसले आहेत. त्यामुळं प्रकल्पग्रस्तांवर एकप्रकारे अन्यायच झालेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोसीखुर्द प्रकल्पातील बाधिताना अद्यापही योग्य तो मोबदला मिळालेला नाही. प्रकल्पाची अवस्था काय आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. आता शासन तेथे पर्यटनाचा उल्लेख करीत आहे. आमचा पर्यटनाला विरोध नाही. परंतु प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असताना पर्यटनबाजी करणं कितपत योग्य आहे, असा सवालही वंजारी यांनी केला. भंडारा जिल्ह्यातील सारेच प्रकल्पग्रस्त या प्रकारामुळं संतापलेले आहेत. त्यातून काहींचा उद्रेक झाला त्यात चुकीचं काय, असंही वंजारी म्हणाले.

भाषणादरम्यान गोंधळ घालणाऱ्या वसंत पडोळे यांच्या विरोधात कारवाई करणार काय, असे विचारले असता पोलिसांनी यासंदर्भात चौकशी सुरू असल्याचे सांगितलं. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यानं स्थानबद्ध करण्यात आलेल्या काँग्रेस व ठाकरे गटाच्या नेत्यांनी मात्र ही उद्रेकाची सुरुवात असल्याचं म्हटलं. आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी शासनाबद्दल असलेला रोष कुणीना कुणी व्यक्त केलाच याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT