Gyayak Patni in Washim. Sarkarnama
विदर्भ

Gyayak Patni News: आमदार पुत्राची बांधिलकी..! वडिलांचं अस्थिविसर्जन सोडून थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर

जयेश विनायकराव गावंडे

Farmer Issue : काही दिवसांपूर्वी कारंजा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या अस्थीविसर्जनाचा कार्यक्रम गुरुवारी (ता. 29) होता. वाशिम जिल्ह्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्याची माहिती आमदार पाटणी यांचे पुत्र ज्ञायक पाटणी यांना मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वडिलांच्या अस्थिविसर्जनाच्या कार्यक्रमापेक्षा नुकसाग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर दिला.

आमदार पुत्र ज्ञायक पाटणी यांच्या या कार्याची चर्चा सध्या संपूर्ण वाशिम जिल्ह्यात होत आहे. कारंजा मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे 23 फेब्रुवारी रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते.

पाटणी यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली. पाटणी यांचे पार्थिव मुंबईवरून आल्यानंतर 24 फेब्रुवारीला आमदार पाटणी यांच्या पार्थिवावर वाशिमच्या मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेत. या घटनेला तीन दिवस होत नाही, तोच विदर्भातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. याचा मोठा फटका वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात बसला. वादळी वारा पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला.

रब्बीतील गहू, हरभरा, भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला. जिल्ह्यातील मंगरूळपीर, कारंजा या मतदारसंघात अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले. नुकसान झाल्याने या परिसरातील शेतकरी संकटात सापडला. पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या व्यथा कुणाकडे मागाव्या असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन झाल्याने मतदारसंघ लोकप्रतिनिधीपासून पोरका झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशातच मतदारसंघातील शेतकऱ्यांनी आमदार पुत्र ज्ञायक पाटणी यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या असता अस्थी दर्शनाचा कार्यक्रम संपताच ज्ञायक पाटणी यांनी वडीलांच्या निधनाचे दुःख बाजूला सारत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आमदार राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मानोरा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वर्गीय आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञायक पाटणी यांच्यासमोर शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत व्यथा मांडली.

ज्ञायक पाटणी यांनी तहसीलदार संतोष जेवलीकर यांच्याशी संपर्क केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांनी नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांसमोरच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधत माहिती दिली.

सर्व मंत्र्यांनी प्रशासनाला पंचनामा करण्याचे निर्देश दिलेत. पाटणी यांनीही याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. ज्ञायक पाटणी यांनी वडिलांच्या निधनाचे दुःख उराशी बाळगत शेतकऱ्यांप्रती दाखवलेली सहानुभूती पाहता भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधानाने निर्माण झालेली पोकळी त्यांच्या मुलाने भरून काढल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT