Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar News Sarkarnama
विदर्भ

OBC Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच राज्य सरकारने 'ओबीसीं'ना दिले लेखी आश्वासन; कुणबी...

Dr. Babanrao Taiwade : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी ही माहिती दिली.

अतुल मेहेरे

Nagpur News : कुणबी जातीसाठी असलेले ओबीसी प्रवर्गातील आरक्षण अन्य कोणत्याही जातीला देण्यात येणार नाही, असे लेखी आश्वासन राज्य सरकारने राष्ट्रीय ओबीसी महासंघाला दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत या विषयावर एकमताने निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी ही माहिती दिली.

राष्ट्रीय ओबीसी (OBC) महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांना राज्य सरकारच्या वतीने मुंबईत झालेल्या बैठकीची माहिती देण्यात आली. कुणबी जातीसाठी असलेले ओबीसी प्रवर्गातील आरक्षण इतर कोणत्याही जातीला दिले जाणार नाही, असे लिखित आश्वासन देण्यात आले आहे. ओबीसी प्रवर्गातून कुणबी जातीसाठी असलेले आरक्षण मराठा समाजाला देण्यात येऊ नये, यासाठी नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपूरच्या संविधान चौकात 21 दिवस आंदोलन चालल्यानंतर सरकारने आंदोलकांना मुंबईत बैठकीसाठी बोलावले होते. या बैठकीत ठरल्यानुसार आता सरकारने ओबीसीतून अन्य कोणत्याही जातीला आरक्षण देणार नसल्याचे जाहीर केल्याने आमच्या लढ्याला यश आल्याचे तायवाडे यांनी सांगितले. तायवाडे यांनी स्पष्ट केले, कोणत्याही समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर ओबीसी समाजाचा विरोध नाही.

मात्र, ओबीसी प्रवर्गातून दुसऱ्या कोणत्याही समाजाला आरक्षण मिळाल्यास ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, अशी ओबीसी समाजाची मागणी होती. सरकारने आता या विषयावर लेखी आश्वासन दिल्यामुळे आमच्याकडून हा मुद्दा संपला आहे, असेही तायवाडे यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाला (Maratha Reservation) कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मुद्द्यावर अद्यापही मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला दिलेली मुदत जवळपास संपत आली आहे. अशाच सरकारने ओबीसी समाजाला दिलेल्या लेखी आश्वासनामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरील पेच वाढतो की काय, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ओबीसी प्रवर्गातून अन्य कोणालाही आरक्षणात वाटेकरी करण्यात येणार नाही, हे सरकारने लिहून दिल्यामुळे राज्यभरातील ओबीसी प्रवर्गात सध्या आनंदाचे वातावरण आहे, तर आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाचे अद्यापही 'वेट अँड वॉच' कायम आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT