Nana Patole Congress Sarkarnama
विदर्भ

Congress Nana Patole : विधानसभेसाठी काँग्रेसची स्वबळाची चाचपणी नानांचे स्पष्टीकरण म्हणाले, यात काही गैर नाही !

Maharashtra Assembly Election 2024 : पक्ष संघटनेमध्ये प्रत्येक भागात संघटनात्मक काम असले पाहिजे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा, तसेच पक्षाची त्या भागातील ताकद समजावी, याासाठी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातून इच्छूकांकडून अर्ज मागविले

Chaitanya Machale

Nagpur News : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस स्वबळाची चाचपणी करत आहे. काँग्रेसने राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील इच्छूकांकडून अर्ज मागविले आहेत. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पक्षाची तयारी करणं यात गैर काय, त्यामुळे याचा कोणताही चुकीचा अर्थ लावू नये, असे पटोले यांनी म्हंटले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षापेक्षा अधिक यश मिळाले आहे. मोठ्या प्रमाणात यश संपादित करणाऱ्या काँग्रेसचा आत्मविश्वास त्यामुळे आता चांगलाच वाढला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेले मोठे यश लक्षात घेत येणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवावी का? याची चाचपणी काँग्रेसने सुरु केली आहे. त्यासाठी काँग्रेसने राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्यांकडून काँग्रेसने अर्ज मागविले असल्याची माहिती समोर आली होती.

काँग्रेसने इच्छूकांकडून मागविलेल्या अर्जांमुळे काँग्रेस स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याबाबतची उलटसुलट चर्चा सुरु झाल्याने आता त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पक्ष संघटनेमध्ये प्रत्येक भागात संघटनात्मक काम असले पाहिजे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा, तसेच पक्षाची त्या भागातील ताकद समजावी, याासाठी राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातून इच्छूकांकडून अर्ज मागविले आहेत. लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्याने सर्वच पक्षांना मोठे यश मिळाले.

त्यामुळे विधानसभा निवडणुका देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढण्याची चर्चा सध्या सुरू आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ज्या जागा काँग्रेसला सुटतील, तेथे आम्ही आमचा उमेदवार उभा करू, इतर मतदारसंघात काँग्रेसची ताकद लक्षात यावी, यासाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे यात काही गैर नाही. याचा कुठेही चुकीचा अर्थ लावू नये, असे पटोले म्हणाले.

नागपूर (Nagpur) येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्षाकडून राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातून इच्छूकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 10 जुलैपर्यंत हे अर्ज प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात जमा करण्याचे आवाहन एका परिपत्रकातून करण्यात आले आहे. हा अर्ज जमा करताना सर्वसाधारण उमेदवारांना पक्षनिधी म्हणून 20 हजार रुपये, तर अनुसुचित जाती, जमाती आणि महिला उमेदवारांना 10 हजार रूपये द्यावे लागणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT