Parinay Fuke On Statue Sarkarnama
विदर्भ

Parinay Fuke : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यावरील तोडग्याने राजकीय प्रतिष्ठेत भर

shivaji Maharaj Statue : गोंदियातील मनोहर चौकात 19 फेब्रुवारीला प्राणप्रतिष्ठा

अभिजीत घोरमारे

Gondia Politics : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा आता गोंदियात निकाली निघाला आहे. गोंदियातील मराठा समाज या पुतळ्याच्या प्रतिक्षेत होता. यासंदर्भात माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनी तोडगा काढला आहे. यामुळे गोंदियात पुन्हा एकदा डॉ. परिणय फुके यांच्या प्रतिष्ठेत भर पडली आहे. या यशस्वी मध्यस्थीमुळे डॉ. फुके यांनी मराठा समाजाच्या मनातही घर केले आहे.

पुतळ्यासाठी गोंदिया शहरातील मनोहर चौकात असलेली 572 चौरस फूट शासकीय जागा आता पुतळ्यासाठी निवडण्यात आली आहे. या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. महाराजांचा पुतळा बसविण्याचा मराठा समाजाचा प्रयत्न होता. गेल्या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये सामाजिक संस्थांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांचा 13 फूट उंच अश्वारूढ पुतळा गोंदियात आणला. मात्र परवानगी नसल्याने हा पुतळा उभारता आला नव्हता.

गेल्या अनेक दिवसांपासून या पुतळ्यासंदर्भात तिढा कायम होता. प्रशासकीयस्तरावर पुतळा बसविण्याची परवानगी नसल्याने हा प्रश्न रखडला होता. त्यामुळे पुतळा गोंदियात आणल्यानंतरही त्याची उभारणी करण्यात आली नव्हती. यासंदर्भात श्री शिवछत्रपती मराठा समाज सातत्याने प्रयत्न केले. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी यात यशस्वी मध्यस्थी केली.

डॉ. फुके यांनी पुढाकार घेत सर्व प्रशासकीय अडथळे दूर केले. शासनस्तरावर सकारात्मक पावले उचलण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. 2 फेब्रुवारीला डॉ. परिणय फुके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा समाजाचे पदाधिकारी व इतर समाज बांधवांची बैठक घेतली. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत समाधानकारक तोडगा काढण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी डॉ. फुके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे हा धार्मिक हेतू नाही. हा राष्ट्रीय अभिमानाचा विषय आहे. त्यामुळे पुतळा बसवावा. याबाबत प्रशासकीय पातळीवर सहमती व्यक्त करत मराठा समाजाला पुतळा बसविण्यास परवानगी देण्यात आली. लवकरच शासकीय पातळीवर मराठा समाज समितीच्या देखरेखीखाली पुतळा शासकीय जागेवर बसवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्यात महाराजांच्या पुतळ्यासाठी निश्चित केलेली जागा राज्य सरकार समाजाला समर्पित करेल, असा विश्वास आहे.

पुतळ्याच्या जागेबाबत आता तोडगा निघाल्याने 19 फेब्रुवारीला मनोहर चौकात पुतळ्याची भव्य स्वरुपात प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी गोंदियात सुरू झाली आहे. पुतळ्याला परवानगी मिळाल्याने सध्या गोंदियात आनंद व जल्लोषाचे वातावरण आहे.

आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे, तहसीलदार समशेर पठाण, पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, मराठा समाजाचे माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, दीपक कदम, संतोष जाधव यांच्या उपस्थितीत बैठकीत पुतळ्याच्या विषयावर तोडगा काढण्यात आला.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT