Protest of Health Workers in Gondia Sarkarnama
विदर्भ

Gondia NHM Protest : आत्रामांच्या गोंदियात एनएचएम कर्मचारी आंदोलनात व्यस्त, सेवेअभावी रुग्ण झाले त्रस्त

अभिजीत घोरमारे

Health Department : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मार्गी लावण्याचं आश्वासन देऊनही ते पाळण्यात न आल्यानं गोंदिया जिल्ह्यातील एनएचएम कर्मचारी गेल्या १४ दिवसांपासून कामबंद आंदोलनात आहेत. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनीच आता पुढं पाऊल टाकावं, अशी आरोग्य कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

गोंदियाच्या पालकमंत्री पदासोबतच आत्राम हे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्रीदेखील आहेत. कॅबिनेटमध्ये त्यांचं चांगलं वजन आहे. त्यामुळं पालकमंत्र्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करणं आरोग्य कर्मचाऱ्यांना अपेक्षित आहे. परंतु तसं न घडल्यानं आंदोलन कायम आहे. त्याचा फटका प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना बसतोय. (Strike of NHM Health Employees from Gondia District suffers Rural Hospitals, Protester expecting Mediation of NCP Minister Dharmarao Baba Aatram)

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची शासनानं २४ ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. राज्यासह भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील कर्मचारी यात सहभागी झाले आहेत. ग्रामीण रुग्णालयातील सेवा त्यामुळं विस्कळीत झालीय. दरम्यान, हा मुद्दा राज्यस्तरावरील असल्यानं यात शासनस्तरावर निर्णय होणं अपेक्षित आहे, असं आत्राम समर्थकांचं म्हणणं आहे.

आरोग्य कंत्राटी कर्मचारी गेल्या १५ वर्षांपासून अल्पमानधनावर आहेत. त्यांना शासनानं अनेकदा सेवेत सामावून घेण्याचं आश्वासन दिलय. मात्र, ते पाळलेलं नाही. त्यामुळं आता या कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललंय. सुमारे १४ दिवसांपासून आंदोलन सुरू असल्यानं त्याची शासकीय पातळीवर दखल घेणं रुग्णहिताच्या दृष्टीनं गरजेचे झालंय. कामबंद असंच कायम राहिल्यास त्याचा फटका ग्रामीण रुग्णांनाच बसणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकदिवसीय धरणे, मोर्चे व लेखणी बंद अशा टप्प्यांनी हे आंदोलन आता कामबंदपर्यंत पोहोचलं आहे. आता आंदोलनाचा पुढील टप्पा अधिक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी आरोग्य कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येतेय. ऐन दिवाळीत हे आंदोलन कायम असल्यानं गोंदियातील आरोग्य यंत्रणेवर त्याचा चांगलाच परिणाम दिसून येतोय. राज्याचा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडं आहे. अशात मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात तत्काळ निर्णय घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांना बाध्य करावं व यासाठी गोंदियाचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पुढाकार घ्यावा, अशी जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र, अद्यापर्यंत यासंदर्भात कृती समितीनं आत्राम यांची अधिकृतपणे भेट घेतलेली नाही.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT