Gadchiroli Police  Sarkarnama
विदर्भ

दमदार कामगिरी : १८ लाखांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षलवाद्यांना अटक…

नक्षलवादी साध्या वेषात गावामध्ये प्रवेश करून नक्षल कारवाई पार पाडणार आहेत, अशी गोपनीय माहिती पोलीस (Police) दलास मिळाली होती. अभियानादरम्यान ४ जहाल नक्षलींना अटक करण्यात यश आले.

मिलिंद उमरे

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या टिसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके धोडराज हद्दीत आज गोपनीय माहितीच्या आधारे नेलगुंडा जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोलीचे (Gadchiroli) जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना चार जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली.

नक्षलवादी साध्या वेषात गावामध्ये प्रवेश करून नक्षल कारवाई पार पाडणार आहेत, अशी गोपनीय माहिती पोलीस (Police) दलास मिळाली होती. पोलीस दलाकडून पार पाडण्यात आलेल्या अभियानादरम्यान ४ जहाल नक्षलींना अटक करण्यात यश आले. अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलवाद्यांमध्ये बापू ऊर्फ रामजी दोघे वड्डे वय ३० वर्ष रा. नेलगुंडा ता. भामरागड, मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधू गावडे वय-३४ वर्ष रा. कनेली ता. धानोरा, सुमन ऊर्फ जन्नी कोमटी कुड्यामी वय २४ वर्ष पडतमपल्ली ता. भामरागड आणि अजित ऊर्फ भरत रा. झारेवाडा ता. एटापल्ली यांचा समावेश आहे.

जहाल नक्षली बापु वड्डे हा कंपनी क्र. १० मध्ये एसीएम पदावर कार्यरत होता १४ ऑगस्ट २०२० रोजी पोमके कोठी अंतर्गत पोलीस शिपाई दुशांत पंढरी नंदेश्वर यांच्या खुनात त्याचा सक्रिय सहभाग होता. तसेच त्यांचा ७ खून, ३ चकमक, १ जाळपोळ, २ दरोडा, अशा एकूण १३ गुन्ह्यांमध्ये समावेश आहे. मारोती गावडे हा गट्टा दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. तसेच तो नक्षलच्या अॅक्शन टीमचा सदस्य होता. त्याचा गुन्ह्यांमध्ये समावेश आहे. सुमन कुड्यामी ही पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिचा ३ खून व ८ चकमक अशा एकूण ११ गुन्ह्यांमध्ये समावेश आहे.

१३ एप्रिल रोजी पोलीस मदत केंद्र गट्टा (जा.) हद्दीमध्ये अशोक ऊर्फ नवीन पेका नरोटे व मंगेश मासा हिचामी या दोन निरपराध आदिवासी नागरिकांच्या खुनाच्या कटामध्ये जहाल नक्षली मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधू गावडे व अजित ऊर्फ भरत रा. झारेवाडा ता. एटापल्ली जि. गडचिरोली यांचा सक्रिय सहभाग होता. नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरिता महाराष्ट्र शासनाने बापू ऊर्फ रामजी दोघे वड्डे याचेवर ८ लाख रुपये, मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधू गावडे याचेवर ६ लाख रुपये, सुमन ऊर्फ जन्नी कोमटी कुड्यामी हिच्यावर २ लाख रुपये आणि अजित ऊर्फ भरत याच्यावर २ लाख रुपये असे एकूण १८ लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. या व्यतिरिक्त त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे, याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.

आजची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, .. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांच्या नेतृत्वात पार पडली. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असून नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT