Sudhir Mungantiwar with Soham and others Sarkarnama
विदर्भ

Sudhir Mungantiwar News : मुनगंटीवारांनाही झाला सोहमची भेट घेण्याचा मोह, कोण आहे हा मुलगा?

संदीप रायपूरे

Chandrapur Political News : पोंभुर्ण्याच्या दौऱ्यावर असताना जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांना आठवीतला विद्यार्थी भेटला. त्याच्या हुशारीने ते दंग झाले. विद्यार्थ्यांसाेबतच्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियातून शेअर झाला. अन् बघता बघता व्हायरल झाला, अन् संपूर्ण राज्यभर सोहमकडे असलेल्या ज्ञानाचे, त्याच्या आत्मविश्वासाचे अनेकांनी कौतुक केले. (Mungantiwar gifted him a book of his choice)

राज्याचे वनमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही सोहमबाबत माहिती मिळाली. सोहमसोबत संवाद साधल्यानंतर त्याची हुशारी, त्याने निश्‍चित केलेले ध्येय्य बघून पालकमंत्रीही भारावले. मुनगंटीवारांनी त्याला त्याच्या आवडीचे पुस्तक भेट दिले.

पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी येथील सोहम उईके हा आठवीतला विद्यार्थी. घरची परिस्थिती बेताचीच. पण सोहमचे ध्येय मोठे आहे. दरवर्षी शाळेत पहिल्या क्रमांकावर येणारा सोहममध्ये कमालीचा आत्मविश्‍वास आहे. यूपीएससीच्या नियोजनाचाही फार्म्युला त्याच्याकडे आहे. आठ तास अभ्यास करायचा, आठ तास झोप घ्यायची. तासभर तरी मित्रांसोबत मनसोक्त खेळायचं अन् आठवड्यातून एक तरी चित्रपट नक्की पाहायचा.

अभ्यासाशिवाय मानवी जीवन निरर्थक आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी पुस्तकांशी मैत्री करावी लागेल. घरी दोन पिढ्यांत कुणालाही नोकरी नाही. मी मात्र अभ्यास करून अधिकारी होणारच, हे त्याचं स्वप्न आहे. चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना सोहममध्ये असलेल्या ज्ञानाची अनुभूती आली. अन् या दोघांत संवाद रंगला. संवादाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला.

यूपीएससीची परीक्षा देऊन जिल्हाधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न असल्याचे समजताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी जॉन्सन यांनी सोहमच्या कुटुंबातील सदस्यांना कार्यालयात बोलावून त्यांचा सन्मान केला. आपल्या खुर्चीवर सोहमला बसवले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आपल्या विधानसभा क्षेत्रात एवढा ज्ञानी मुलगा असल्याची माहिती मिळाली, अन् त्याची भेट घेण्याचा मोह तेसुद्धा आवरू शकले नाहीत.

सोहमसोबत चंद्रपुरातील कार्यालयात मुनगंटीवारांची भेट झाली अन् त्यांनी त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. सोहमला त्यांनी कोणकोणते विषय आवडतात, याबाबतची विचारणा केली असता, इतिहास व भूगोल आवडीचे विषय असल्याचे त्याने सांगितले. या वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सोहमकडून त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाची माहिती घेतली. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या आठवीतल्या मुलाची हुशारी त्याच्यात असलेला कमालीचा आत्मविश्वास व त्याची बोलण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली बघून मुनगंटीवारही भारावले.

मंत्री मुनगंटीवार यांनी जाहीरपणे सोहमचे कौतुक करीत त्याला त्याच्या आवडीची पुस्तके भेट दिली. प्रेमाने त्यांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. जीवनात अभ्यास करून खूप मोठा हो. आपल्या आईवडिलांसह जिल्ह्याचे नाव रोशन कर, असे मुनगंटीवार यांनी त्याला सांगितले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट झाल्याने मला प्रचंड आनंद झाला असल्याचे या वेळी सोहम म्हणाला. या प्रसंगी अल्का आत्राम, ज्योती बुरांडे, धनराज सातपुते आदी होते.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT