MP Sunil Mendhe in Yatra. Sarkarnama
विदर्भ

Bhandara : रथयात्रेतून खासदार सुनील मेंढेंचा अश्वमेध महायज्ञ नेमका कशासाठी...?

Sunil Mendhe : श्रीराम नामाचा झेंडा खांद्यावर घेत रथयात्रेला मतदार संघातून सुरुवात

अभिजीत घोरमारे

Shree Ram Rath Yatra : आपल्या राज्याचा विस्तार अखंड ठेववण्यासाठी प्राचीन काळात अश्वमेध महायज्ञ करण्याची परंपरा होती. या महायज्ञात राजा आपला चक्रवर्तीपणा सिद्ध करण्यासाठी एक घोडा, त्यामागे रथावर बसलेले सैन्यबळ पाठवून आपल्या कतृत्वाचा झेंडा पंचक्रोशित फडकवायचे. असाच काहीसा प्रकार फक्त थोडा आधुनिक युगातील भंडारा जिल्ह्यात बघायला मिळत आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे भाजप खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृत्वात मंगळवारी (ता. 2) अड्याळ (पवनी) शहरातून श्रीराम रथयात्रेला सुरुवात झाली. ही रथयात्रा त्यांच्या लोकसभा मतदार संघात फिरणार आहे. महायुतीत अद्याप लोकसभेसाठी जागा वाटप झालेले नाही. अशात खासदार मेंढे यांची ही रथयात्रा चर्चेचा विषय ठरत आहे. आपले साम्राज्य कायम राहावे, यासाठी तर हा ‘अश्वमेध’ सुरू नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

पवनी तालुक्यातील अड्याळ शहरात खासदार मेंढे यांनी सपत्नी श्रीराम रथाचे नेतृत्व केले. 1990 मध्ये बजरंग दलाचे जिल्हा संयोजक असताना कारसेवक म्हणून मेंढे यांनी अयोध्येत गेले होते. त्यांनी तेथे कारसेवा दिली होती. त्यावेळी त्यांना जोनपूर कारागृहात दहा दिवस कोठडीत राहावे लागले होते. मेंढे यांच्यासोबत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण व विद्यमान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील होते. आता त्याच जागेवर अयोध्ये श्रीराम मंदिर बांधले गेले आहे. 22 जानेवारीला मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे.

देशभरात रामनामाचा गजर सुरू असताना खासदार मेंढेही त्यापासून अलिप्त नाहीत. कारसेवकांच्या बलिदानातून आणि रामाप्रती असलेल्या श्रद्धेतून अखेर मंदिर निर्माणाचे स्वप्न साकार होत आहे. अशात स्वत: कारसेवा देणारे खासदार मेंढे यांनी रथयात्रा आयोजित केली आहे. रथयात्रा भंडारा-गोंदिया जिल्ह्यात फिरणार आहे. सहा लाख पणत्यांचेही वाटप यात्रेतून करण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप महायुतीसोबत राहात 2024 मधील लोकसभा निवडणूक लढविणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभेवर महायुतीमधील भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटही दावेदारी करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत असलेले ‘बॅनर्स’ झळकले होते. त्यावेळी प्रफुल्ल पटेल महायुतीतून भंडारा-गोंदियाची लोकसभा लढविणार, अशा चर्चेला उधाण आले होते.

या घडामोडी लक्षात घेता खासदार सुनील मेंढे यांनी श्रीरामाची रथयात्रा काढत मतदारांना आपण ‘चक्रवर्ती’ राहणार असल्याचा अप्रत्यक्ष संदेशच दिल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे भाजपनेही खासदार मेंढे यांना ‘तयारीत राहा’ असा निरोप दिल्याशिवाय ते स्वत: असा खटाटोप करणार नाही, असेही सांगण्यात येत आहे. परंतु सर्वच ठाम असताना मध्य प्रदेशात शिवराज सिंह चव्हाण यांच्याऐवजी जसा मोहन यादव यांचा चेहरा पुढे आणत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाते सर्वांनाच धक्का दिला, तसे महाराष्ट्रात तर अघटित घडणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT