Tukum, Chandrapur Sarkarnama
विदर्भ

Tadoba Buffer Zone News : सरपंचांनी सदस्यांनाच बनवले गाइड, गावकरी संतापले अन् कार्यालयाला ठोकले कुलूप !

संदीप रायपूरे

Chandrapur District Political News : गावस्तरावरचे छोटे छोटे विषय कधी आक्रमक रूप घेतील हे सांगता येत नाही. ताडोबा बफर झोनमध्ये येत असलेल्या कोलारा या गावात सध्या याचाच प्रत्यय येत आहे. अंधारी-ताडोबा हा जागतिक व्याघ्र प्रकल्प आहे. ताडोब्यामध्ये येणाऱ्या अनेक गावांतील बेरोजगारांना जिप्सी व गाइडच्या माध्यमातून रोजगार मिळत आहे. (The unemployed in the villages are getting employment through Gypsies and Guides)

चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारा तुकूम या गावात सरपंच व ग्रामपंचायत सदस्य मनमानी कारभार करीत आहेत. त्यांचा याबाबत वन विभागाशी समन्वय नाही. त्यामुळे गावातील नागरिकांत प्रचंड संताप आहे. याच संतापातून रविवारी (ता. १५) एकत्र येत गावकऱ्यांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. अद्यापही ग्रामपंचायत कार्यालय कुलूपबंदच आहे.

का आला गावकऱ्यांना राग?

कोलारा तुकूम या गावात ताडोबा कोअर झोन व बफर झोनमधील प्रवेशद्वार सुरू आहे. यातूनच अनेक पर्यटक प्रवेश करून व्याघ्रसफारीचा आनंद घेतात. जगभरातील अनेक पर्यटक येथे येत असल्यामुळे गाइड व जिप्सी येथील प्रमुख व्यवसायाचे साधन झाले आहे.

अशावेळी कोलारा तुकूम येथे घेण्यात आलेल्या ग्रामसभेत सरपंचांनी आपल्या मनमर्जीनी स्वतःचे, ग्रामपंचायत सदस्याचे व शासकीय नोकरीचा लाभ घेणाऱ्यांची नावे जिप्सी व गाइडकरिता टाकण्यात आली. गावकऱ्यांना या प्रकाराची माहिती होताच त्यांनी ग्रामपंचायतीच्या या धोरणाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला आणि ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकले.

सरपंचांनी काढला पळ...

शोभा कोयचाळे या कोलारा तुकूमच्या सरपंच आहेत. २८ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत गावकऱ्यांनी सरपंचांना विविध कारणांवरून धारेवर धरले. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. गावात विविध समस्या व बेरोजगारांचा प्रश्न असताना सरपंच मनमानी कारभार करीत आहेत. हे खपवून घेतल्या जाणार नाही, असे सांगत त्यांनी आपला रोष व्यक्त केला. गावकऱ्यांत असलेली नाराजी बघून सरपंच कोयचाळे यांनी ग्रामसभेतून पळ काढला.

गावकऱ्यांनी बैठक घेतली अन् कुलूप ठोकले...

गावात अनेक बेरोजगार असताना सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आपल्याच मनमर्जीतील लोकांना जिप्सी व गाइडचे काम देत आहेत. वन विभागाशी ग्रामपंचायतीचा समन्वय नसल्याने गावांकरिता येत असलेल्या विविध याेजनांची माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी बैठक घेतली. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रतिराम वांढरे, माजी अध्यक्ष डेकाटे यांच्या नेतृत्वात गावकरी एकत्र आले. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.

गावकऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी कामकाज करणारी ग्रामपंचायतीची कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी केली. यासंदर्भात सरपंच शोभा कोयचाळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. २८ ऑगस्टच्या ग्रामसभेत काही लोकांनी दारू पिऊन धिंगाणा घातला होता. आता ग्रामपंचायतीला कुलूप ठोकल्यानंतर या प्रकाराची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये केल्याची माहिती सरपंच कोयचाळे यांनी दिली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT