Nagpur ZP
Nagpur ZP Sarkarnama
विदर्भ

रजा घ्या, अन् पतसंस्था निवडणुकीत प्रचार करा; प्रचारासाठी शिक्षकांचे जत्थे शाळेत !

निलेश डोये

नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या. विद्यार्थी शाळेत येत असून शिक्षक मात्र प्रचारात व्यस्त आहे. शिक्षकांशी संबंधित पतसंस्थेची निवडणूक आहे. आपला पॅनल निवडून आणण्यासाठी रजा घ्या, उमेदवाराचा प्रचार करा, असा संदेशच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांना दिलेत. तर दुसरीकडे निवडणुकीच्या (Election) निमित्त शिक्षकांच्या जत्थेच्या जत्थेच शाळेत दाखल होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते.

नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेतील (ZP) शिक्षकांच्या दोन पतसंस्था आहे. यातील एका पतसंस्थेकरता दोन आठवड्यांनी निवडणूक होणार आहे. १७ पदासाठी ही निवडणूक होत असून यात ३ हजारांवर शिक्षक सदस्य आहेत. निवडणुकीत दोन पॅनल उभे आहेत. आपल्याच पॅनलमधील उमेदवार निवडून यावे, यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जिवाचे रान करण्यात येत आहे. पतसंस्थेच्या निवडणुकीत ‘परिवर्तन’ कराचये असल्याने ‘आपले’ पॅनल निवडून आणा.

त्यासाठी रजा घ्या, जोरात प्रचार करा, असा संदेशच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाठविण्यात येत आहे. आधीच शिक्षकांची संख्या कमी असल्याची ओरड होत आहे. कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेचा आहे. दुसरीकडे निवडणुकीत शिक्षक व्यस्त आहे. यासाठी अनेकांनी सुटी टाकली असून काही जण अर्ज करणार आहे. प्रचारासाठी शिक्षकांच्या जत्थेच्या जत्थे शाळेला भेटी देत असून उमेदवाराला मतदान करण्यास सांगत आहे. यामुळे वर्गावर परिणाम होत आहे. याचा थेट परिणाम शिक्षणावर होणार आहे.

शिक्षकांचे नियोजन..

अनेक शाळेत शिक्षकांची कमी आहे. विद्यार्थी व वर्गाच्या तुलनेत ही संख्या तोकडी आहे. त्यामुळे शिक्षक संख्या लक्षात घेता शिक्षणावर परिणाम होणार नाही, याचे नियोजन करून शिक्षक रजा घेत असल्याचे समजते. तर काही जण शाळा संपल्यावर प्रचार करीत असल्याचे सांगण्यात येते.

शिष्यवृत्ती परीक्षा..

शिष्यवृत्ती परीक्षा याच महिन्यात होणार असल्याची माहिती आहे. सर्वच विद्यार्थ्यांना या परीक्षात बसविण्यात येणार आहे. जास्तीत जास्ती विद्यार्थी यात उत्तीर्ण व्हावे, यासाठी त्यांची सराव परीक्षा घेण्याचे सीईओ योगेश कुंभेजकर यांनी निश्चित केले आहे. परंतु शिक्षक निवडणुकीत व्यस्त असल्याने यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीईओ याबाबत काय निर्णय घेतात, याकडेच अनेकांचे लक्ष लागले आहे.

विद्यमान सत्ताधारी दोन्ही पॅनलमध्ये..

१७ पदासाठी निवडणूक होत आहे. विद्यमान सत्ताधाऱ्यांमध्ये फुट पडली असून दोन्ही पॅनलमध्ये त्याचा सहभाग असल्याचे सांगण्यात येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT