MP Hemant Patil Sarkarnama
विदर्भ

MP Hemant Patil News : हिंगोलीत राजकारण तापलं, खासदार हेमंत पाटलांना ठाकरे गटाची धमकी; म्हणाले, "यापुढे ते जिल्ह्यात फिरले तर..."

Deepak Kulkarni

Hingoli : शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदेंनी काही आमदारांसह बंड केलं आणि शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन गट शिवसेनेत पडले. यानंतर आत्तापर्यंत दोन्ही गटांतला कायेदशीर संघर्ष अनुभवला. शिवाय आरोप -प्रत्यारोपांनी महाराष्ट्राचं राजकारण पूर्णत: ढवळून निघाले.

यानंतर शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला होता. तसेच ठाकरे गटाला मशाल चिन्ह बहाल केले. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती, यावर आजपासून सुनावणी पार पडतेय. याचदरम्यान, आता हिंगोलीत ठाकरे गट आणि शिंदे गटातला वाद चिघळला आहे.

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून राजकारण चांगलंच तापलं आहे. याचेच तीव्र पडसाद हिंगोलीत उमटत आहेत. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे गट तिथे आक्रमक झाले असून, धरणे आंदोलन पुकारले आहे. याचेवळी ठाकरे गटाचे(Thackeray Group) जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांनी हिंगोलीचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवतानाच धमकीवजा इशारा दिला आहे.

विनायक भिसे म्हणाले, मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच स्थानिक खासदार मात्र बायका नाचवत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच आत्तापर्यंत हिंगोली जिल्ह्याच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या नाहीत, त्यामुळे यापुढे खासदार हेमंत पाटील जर जिल्ह्यात फिरले तर त्यांचे कपडे काढू, असा इशारा खासदार पाटलांना दिला आहे.

हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाचा वणवा पेटलेला असताना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी शहरातील तिरुमला लॉन्स येथे 1982 ते 86 काळातील शासकीय वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 9 सप्टेंबर रोजी ‘करते तुम्हास मुजरा’ या लावणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना या लावणी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे खासदार हेमंत पाटील(Hemant Patil) यांच्यावर ठाकरे गटाकडून हल्लाबोल करण्यात आला होता.

या वेळी ठाकरे गटाने हिंगोली जिल्ह्यात एकाही मराठा आंदोलकाची भेट घेतली नाही. विशेष म्हणजे वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील स्मशानभूमीत 7 जणांनी सुरू केलेल्या उपोषणाला हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यांतील मराठा समाजबांधव शेकडोच्या संख्येने भेट देऊन पाठिंबा देत आहेत.

तसेच हिंगोली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख, अजित मगर आदी पदाधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पाठिंबा दिला आहे. मात्र, हेमंत पाटलांनी उपोषणार्थींची साधी भेटही घेतली नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT