Mumbai News: शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट अनेकदा आमनेसामने आल्याचे चित्र राज्यभरात पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गट आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ठाकरे गटाच्या शिवसेना भवनासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची नवी शाखा सुरू करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेची शाखा थेट शिवसेना भवनासमोरच सुरू करण्यात येणार असल्याने पुन्हा एकदा दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन राजकारण तापण्याची शक्यता आहे. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शिंदेंच्या शिवसेनेच्या या नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाकडे सोपवल्यानंतर शिवसेनेच्या अनेक ठिकाणच्या शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे-ठाकरेंचे समर्थक आमनेसामने आले होते. त्यामुळे राज्यात चांगलंच राजकारण तापलं होतं. यानंतर आता ठाकरे गटाच्या शिवसेना भवनासमोरच शिंदेंच्या शिवसेनेची शाखा सुरू होणार असल्याने दोन्ही गटांचे कार्यकर्ते पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच सभा, मेळावे घेण्यावर नेत्यांचा भर असला तरी सध्या टीका टिप्पणीचे राजकारण सुरू आहे. यातच आता शिवसेना भवनासमोरच शिंदेंच्या शिवसेनेची शाखा सुरू होणार असल्याने शिंदे-ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमधील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
Edited by - Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.