Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

तालुकाध्यक्षाच्या तक्रारीची वनमंत्र्यांनी घेतली दखल, अन् लगेच दिले चौकशीचे आदेश !

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

संदीप रायपूरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : एका गरीब शेतक-याला शेतजमिनीचे अतिक्रमण काढण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दमदाटी केली. त्याच्या शेतातले कंपाऊंड केलेले तारही तोडले. वनविभागाच्या (Forest Department) दमदाटीमुळे गोजोली येथील गणपती सोनुने यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून चंद्रपुरात (Chandrapur) उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी वनविभागाच्या (वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

आता यामुळे वनविभागाचे (Forest Department) अधिकारी चांगलेच धास्तावले आहेत. दरम्यान भाजपचे (BJP) तालुकाध्यक्ष बबन निकोडे यांनी धाब्याचे आरएफओ शेषराव बोबडेंना निलंबित करावे, अशी मागणी केली आहे. गणपती सोनुने यांच्यासोबत अनेकांनी वनजमिनीचे पट्टे मिळविण्यासाठी जिल्हाधिका-यांकडे (Collector) प्रकरण दाखल केले आहे. मात्र अजूनही प्रकरणे प्रलंबित आहेत. धाबा वनपरिक्षेत्रातील वनअधिकारी व वनकर्मचारी वारंवार अतिक्रमण काढण्यासंदर्भात शेतक-यांवर दबाव आणतात.

सोनुने कुटुंबीयांच्या म्हणण्‍यानुसार १ ऑक्टोबर रोजी काही वनकर्मचा-यांनी उभे पीक असलेल्या शेतात येऊन अतिक्रमण काढण्यासाठी बजावले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा धसका घेत दुसऱ्या दिवशी सकाळी गणपती सोनुने यांनी कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. गंभीर प्रकृती लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान अजूनपर्यंत त्यांच्या प्रकृतीमध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा दिसून येत नसल्याची माहिती आहे.

अशावेळी वनविभागाकडून नाहक दिला जाणार त्रास त्या शेतकऱ्याच्या जिवावर उठला आहे. दरम्यान त्याचवेळी गोजोली येथील घटनेनंतर तालुक्यातील समाज माध्यमातून वनाधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी या प्रकरणाकडे थेट वनमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्याची दखल वनमंत्र्यांनी घेतली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश त्यांनी मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षकांना दिले आहेत.

आरएफओची बदनामीसंदर्भात तक्रार..

शेतकरी आत्महत्यांच्या प्रयत्नाप्रकरणी वनविभाग वादाच्या भोव-यात सापडला आहे. आता धाबा वनपरिक्षेत्राधिकारी शेषराव बोबडे यांनी आपली नाहक बदनामी होत असल्याचे सांगत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

बोडलावारांकडून मदत..

चंद्रपूरात उपचार सुरू असलेल्या गणपती सोनुने यांची माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत स्वप्निल अनमुलवार, सुरज भस्की, बयाबाई शेंडे, हरीष घोगरे होते.

गरीब शेतकऱ्याला दमदाटीनंतर आत्महत्येच्या प्रकरणात आम्ही आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी आता धाब्याचे वनपरिक्षेत्र शेषराव बोबडे यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे. प्रशासनाने वनहक्काच्या प्रलंबित दाव्यांचा तातडीने निपटारा करावा. जेणेकरून वर्षानुवर्षे शेतांत राबणाऱ्यांना न्याय मिळेल.

- बबन निकोडे, भाजप तालुकाध्यक्ष, गोंडपिपरी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT