Vinay Gauda Sarkarnam
विदर्भ

Administration : चंद्रपुरात तत्परतेने राबताहेत विनय गौडा; संपूर्ण प्रशासनाचा होतोय ‘सिना चौडा’

Decency : जिल्हावासीयांना पुन्हा दिला साधेपणाचा प्रत्यय

संदीप रायपुरे - Sarkarnama

Chandrapur IAS News : प्रशासनातील अनेक आयएएस, आयपीएस जनतेपासून अलिप्त राहतात. शासकीय निवासस्थान ते कार्यालयातील वातानुकूलित कक्षापुरतेच ते मर्यादित असतात. अनेक लोकांशी अधिकारी उर्मटपणे वागतात. त्यामुळे ग्रामीण भागातील एखादा माणूस कलेक्टर, एसपीपर्यंत पोहोचला तरी त्याला काय मिळवलं अन् काय नाही असं वाटतं. काही अधिकारी याच्या अगदी विरुद्ध असतात व आपल्या कार्यकाळात ते लोकांची कामं करून त्यांची मनं जिंकतात. असाच प्रत्यय पुन्हा एकदा चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिलाय.

विनय गौडा यांनी काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील धानाच्या शेतात जात प्रत्यक्ष रोवणी केली होती. रोवणी करतानाचे त्यांचे फोटो व व्हिडिओ चांगलेच गाजले होते. लोकांत आणि प्रशासकीय वर्तुळातही. चंद्रपुरात रुजू झाल्यापासून गौडा यांनी आपल्या कार्यशैलीतून लोकांना आपलंसं करून घेतलंय. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताला ते आवर्जून भेटतात व त्याची समस्या सोडविण्याचाही प्रयत्न करतात. आपल्या अशाच एका कृतीतून त्यांची चंद्रपुरातील एका गावाचं मन जिंकलं. कलेक्टर गौडा साहेब गावातील काम झाल्यानंतर मुख्यालयी निघून गेले, परंतु अद्यापही गावात त्यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे. (The promptness of the district collector in Chandrapur won the hearts of the people)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गावात आल्यावर प्रकल्पग्रस्तांशी संवाद

भद्रावती तालुक्यातील बोटेझरी व चंद्रपूर तालुक्यातील कोळसा ही दोन प्रकल्पग्रस्त गावं. या गावांचं मूल तालुक्यातील भगवानपूर येथं पुनर्वसन करण्यात आलं. पुनर्वसन झाल्यानंतर गावात नेमकं काय चाललंय हे बघण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा कुणालाही कानोकान खबर लागू न देता अचानक गावात अवतरले. गौडा गावात येण्याच्या काही वेळापूर्वीच इतर अधिकाऱ्यांना ते येत असल्याचं कळलं. त्यामुळे साऱ्यांचीच धावाधाव झाली. सहकारी अधिकाऱ्यांनीही भगवानपूर गाठलं.

गावात पाय ठेवताच गौडांनी प्रकल्पग्रस्तांशी संवाद सुरू केला. पाणी येतं का, रस्ते कसे आहेत, नाल्यांची काय व्यवस्था आहे, आरोग्य तपासणीसाठी कुठं जाता, तुमच्या गावातलं पांदण रस्ते दाखवा बरं, तलावाचं काम कसं सुरू आहे, भोगवटदारांचे रूपांतर होतंय का, अशी सारी माहितीच त्यांनी ग्रामस्थांकडून घेतली. ग्रामस्थ बोलत असताना एकाही अधिकाऱ्याला गौडा यांनी ते काही सांगत असताना मध्ये बोलू दिलं नाही. अख्खं गाव फिरल्यानंतर जिल्हाधिकारी गौडा जिल्हा परिषदेच्या शाळेकडं वळले.

गौडा आले त्यावेळी वर्गखोल्यांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट सुरू होता. आता अचानक कलेक्टर साहेब आले म्हटल्यावर शाळेतील शिक्षकही जरा दचकले. गौडा थेट एका वर्गात शिरले. शाळेत पोषण आहार (नाश्ता, जेवण) काय मिळतं, चवीला कसं असतं, खेळायला कोण्या मैदानावर जाता, शिक्षक येतात का, शिकवतात का हे त्यांनी विद्यार्थ्यांकडून जाणून घेतलं. शाळेच्या वर्गखोल्यांची, आवाराची आदी पाहणी केली. मुलांशी गप्पा मारल्या आणि गावातून रवाना झाले.

गौडा यांनी त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मूल व सावली तालुक्यातील महिलांनी एमआयडीसीतील कार्पेट निर्मिती आणि प्रशिक्षण केंद्रालाही त्यांनी भेट दिली. कार्पेट निर्मितीची नेमकी प्रक्रिया त्यांनी जाणून घेतली. मूलचे मैत्रीण लोकसंचालित साधना केंद्र गाठले. तेथे बांबूपासून बनविण्यात येणाऱ्या विविध वस्तू पाहिल्या. चंद्रपुरात नियुक्ती झाल्यापासून ज्या पद्धतीने विनय गौडा काम करीत आहेत, त्यामुळे तत्परतेने राबताहेत विनय गौडा; संपूर्ण प्रशासन व शासनाचा होतोय ‘सिना चौडा असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

(Edited by : Prasannaa Jakate)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT