Nana Patole and Prarull Patel on Nagpur Municipal Corporation Sarkarnama
विदर्भ

भंडारा-गोंदिया झेडपी सत्तास्थापनेचे पडसाद नागपूर महानगरपालिकेवर उमटणार!

गत वेळी नागपूर महानगरपालिकेल (Municipal Corporation) राष्ट्रवादी कॉंग्रेसचा केवळ एक आणि शिवसेनेचे दोनच नगरसेवक निवडून आले होते. येत्या निवडणुकीत एकएकटे लढल्यास फार काही त्यांच्या पदरी पडेल, असे चित्र सध्यातरी दिसत नाही.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : भंडारा जिल्हा परिषदेत कॉंग्रेसने भाजपमधून निष्कासीत झालेले माजी आमदार यांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. गोंदिया जिल्हा परिषदेमध्येही नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांनी टोकाची भूमिका घेतली. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पटोलेंनी रोखठोख भूमिका घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे टेंशन वाठविले आहे.

गत वेळी नागपूर महानगरपालिकेत (Municipal Corporation) राष्ट्रवादी कॉंग्रेसचा केवळ एक आणि शिवसेनेचे दोनच नगरसेवक निवडून आले होते. येत्या निवडणुकीत एकएकटे लढल्यास फार काही त्यांच्या पदरी पडेल, असे चित्र सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे आघाडीची (Mahavikas Aghadi) गरज राष्ट्रवादी (NCP) आणि सेनेला आहे, अशीच काहीशी सद्यस्थिती आहे. त्यातच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकला चलो रे चा सूर आवळला आहे. ‘आता नागपूर (Nagpur) महापालिकेत स्वबळावर लढावे लागेल असे दिसते’, असे मत राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. त्यामुळे आता राष्ट्रवादीला शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही.

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पटोले यांनी राष्ट्रवादीवर थेट पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला. महाविकास आघाडीबाबत दोन्ही जिल्हा परिषदेसंदर्भात लिखित करार झाला होता. तो राष्ट्रवादीनेच तोडला असे सांगून यास राष्ट्रवादीचे विदर्भातील नेते खासदार प्रफूल पटेल यांच्यावर निशाना साधला. पटोलेंचे वक्तव्य जिव्हारी लागल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या वादात उडी घेतली. पटोलेंची पार्श्वभूमी त्यांनी काढली. त्यावर पटोले यांनी संधी न दडवता पहाटेच्या शपथविधीचे स्मरण करून दिले. त्यावरून पटोले आणि राष्ट्रवादीचा वाद टोकाला गेल्याचे स्पष्ट होते.

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित लढावे, असे प्रयत्न केले जात होते. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनीसुद्धा ‘नागपूरमध्ये आम्ही एकत्र लढू’ असे सांगितले होते. नागपूरची परिस्थिती बघून राष्ट्रवादीलासुद्धा महाविकास आघाडी हवीच आहे. काँग्रेसची भूमिका मात्र सुरुवातीपासूनच स्वबळावर लढण्याची आहे. काँग्रेसकडे सुमारे दीड हजार इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेला काही जागा सोडल्यास त्या प्रभागांमध्ये पंजा गोठला जाईल. पुढील लोकसभा आणि विधानसभेत याचा फटका बसेल, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे.

ऐनवेळी दगाफटका केल्यास काय?

नागपूर मनपात आघाडी झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी उमेदवार मतदानाच्या वेळी दगाफटका करणार नाही याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे नाना पटोले यांनी घेतली भूमिका योग्यच असल्याचे काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने बोलताना सांगितले.

विषाची परीक्षा कशासाठी?

स्थानिक विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आम्हाला साथ दिली नव्हती असा आरोप काँग्रेसचा आहे. पराभवानंतर राष्ट्रवादीच्या पदधिकाऱ्यांच्या प्रतिक्रियांवरून तसेच अंकित होते. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत विषाची परीक्षा घेऊ नये, स्वबळावर निवडणूक लढावी आणि सत्तास्थापनेच्यावेळी गरज पडल्यास एकत्र यावे, असे नागपूरमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT