Sanjay Rathod, Uddhav Thackeray and Sanjay Deshmukh. Sarkarnama
विदर्भ

संजय राठोडांना धडा शिकवण्याची जबाबदारी ‘संजय’वरच, ठाकरे बांधताहेत मराठा-बंजारा मोट !

माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख (Sanjay Deshmukh) आज उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत.

अतुल मेहेरे

नागपूर : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत ४० आमदार गेले. त्यामध्ये यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील दिग्रस-दारव्हा-नेर मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनीसुद्धा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदही मिळवले. पण आता शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राठोडांना (Sanjay Rathod) धडा शिकवण्यासाठी त्यांना घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे.

बंजारा समाजाचे महंत पोहरा देवीचे सुनील महाराज यांनी नुकताच शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये प्रवेश केला. (त्यानंतर आता राज्याचे माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख (Sanjay Deshmukh) आज उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत. संजय देशमुख आज आदी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृती स्थळावर येऊन दर्शन घेतील. त्यानंतर सेना भवनात दाखल होतील. तेथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा सेना प्रवेश होणार आहे. संजय देशमुख आणि महंत सुनील महाराज यांच्या माध्यमातून कुणबी-मराठा आणि बंजारा समाजाची मोट बांधण्याची रणनीती ठाकरेंनी आखली आहे.

संजय देशमुख हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. ते उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून लढल्यास मंत्री संजय राठोडांना त्याचा मोठा फटका बसू शकत. आज त्यांचा उद्धव सेनेमध्ये प्रवेश होत असताना जुन्या जाणत्या शिवसैनिकांना त्यांना तसूभरही विरोध केलेला नाही. त्यामुळे संजय राठोडांना धडा शिकवण्याची तयारी निष्ठावान शिवसैनिकांनी केल्याचे दिसते. संजय देशमुखांच्या प्रवेशाने कुणबी-मराठा हे जातीय समीकरण जुळून येणार आहे. मंत्री संजय राठोड हे बंजारा आहेत. त्याचा तोड म्हणून बंजारा समाजाची काशी असलेले तिर्थस्थळ पोहरादेवीचे महंत सुनील महाराज हेसुद्धा शिवसेनेत दाखल झाले आहेत. हळूहळू संजय राठोड यांना ठाकरेंकडून घेरले जात आहे.

संजय देशमुख हे जातीय समीकरणात परफेक्ट बसतात. दारव्हा, दिग्रस, नेरचे या विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात आजही त्यांचे वजन आहे. त्यांच्या येण्याने कट्टर शिवसैनिक मोठ्या संख्येने जुळणार आहेत. याशिवाय बंजारा समाजातील एक मोठे नाव पुढील महिन्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत जुळणार आहे. संजय देशमुख यांची परिवर्तन ही मोठी संघटना आहे. परिवर्तवनर त्यांनी ग्रामपंचायती आणि सोसायट्यांच्या निवडणुका लढल्या आणि बऱ्यापैकी यशसुद्धा मिळवले. त्यांचे निवास असलेल्या दिग्रसमध्ये त्यांचा चांगला जोर आहे. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते क्रीडा राज्यमंत्री होते. त्यावेळी ते अपक्ष निवडून आले होते आणि राज्यभरातील अपक्ष आमदारांचे संघटन करून त्यांनी मंत्रिमंडळात प्रवेश मिळविला होता.

निष्ठावंतांची यात्रा..

पुढील महिन्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पोहरादेवीला येणार आहेत. त्यासाठी तयारी म्हणून दिवाळीनंतर ‘निष्ठावंतांची यात्रा निष्ठावंतांच्या दारी’, हा उपक्रम उद्धव ठाकरे सेना राबविणार आहे. जे शिवसैनिक शिंदे गटात गेले नाही, त्यांच्या घरी दिवाळीनिमित्त भेटी देऊन संघटन बांधणी करण्यात येणार आहे. २०२४च्या निवडणूक प्रचाराची ही सुरूवात म्हटल्यास वावगे होणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT