Sunil Kedar, ZP, Nagpur
Sunil Kedar, ZP, Nagpur Sarkarnama
विदर्भ

Sunil Kedar : काॅंग्रेसच्या गोटात धाकधूक होती; पण सुनील केदारांनी करुन दाखवले...

Atul Mehere

नागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळ्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवर प्रभाव पडेल, असे बोलले जात होते. पण ग्रामीणच्या राजकारणावर प्रभाव ठेवून असलेले माजी मंत्री, आमदार सुनील केदार यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणावर आपली पकड अजूनही मजबूत असल्याचे सिद्ध केले.

नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेत पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणूकीत नागपूर जिल्हा परिषदेवर (ZP) केदार गटाचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले. काॅंग्रेसच्या मुक्ता कोकर्डे अध्यक्ष तर कुंदा राऊत यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. यामुळे सुनील केदारांची (Sunil Kedar) ग्रामीणमधील पकड किती मजबूत आहे, याची पुन्हा एकवार प्रचिती आली. शिवाय केदारांना टाळून राजकारण करता येणार नाही, असा संदेशही कार्यकर्त्यांमध्ये गेला.

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या शांता कुमरे, मुक्ता कोकर्डे व देवानंद कोहळे यांची तर उपाध्यक्षपदासाठी सुमित्रा कुंभारे, मनोहर सव्वालाखे यांची नावे चर्चेत होती. उपाध्यक्षपदासाठी कुंदा राऊत यांचे नाव ठरवण्यात आले. त्यांचे वडील श्यामदेव राऊत हे जिल्हा परिषदेचेअध्यक्ष होते. सर्व गटांना चालणाऱ्या असल्याने त्यांचे नाव समोर आले. सत्ताधारी काँग्रेसकडे बहुमत असले तरी एक गट नाराज असल्याने पक्षात धाकधूक होती. मात्र हे बंड वेळीच मोडीत निघाल्याने बंडाळी टळली. अध्यक्षांना ३९, उपाध्यक्षांना ३८ मते मिळाली. तर बंडखोर नाना कंभाले यांनी उभे केलेल्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला १८ तर उपाध्यक्षाला १९ मते मिळाली.

५८ सदस्यीय जिल्हा परिषदेत ३३ सदस्यीय काँग्रेसकडे बहुमत आहे. १४ जागा भाजपकडे तर ८ जागा राष्ट्रवादीकडे आहेत. काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांच्या गटाचे जिल्हा परिषदेवर वर्चस्व असून सध्या त्यांच्या गटाच्या रश्मी बर्वे या अध्यक्ष होत्या. नवा अध्यक्ष ठरवताना केदार यांची भूमिका निर्णायक ठरली. पहिले अडीच वर्ष अध्यक्षपद केदार गटाला देण्यात आल्याने उर्वरित काळासाठी ते इतरांना द्यावे, अशी काँग्रेसमधील केदार विरोधी गटाची मागणी होती. यातूनच पक्षातील नाना कंभालेंनी वेगळी चूल मांडली. त्यांच्याकडे तीन सदस्य असल्याचा दावा केला जात होता. मात्र त्यातील दोन सदस्य सोमवारीच तंबुत परतल्याने कंभाले एकाकी पडले होते.

काँग्रेसकडे असलेले ३३ सदस्यांचे संख्याबळ लक्षात घेता नाराज सदस्यांनी वेगळी भूमिका घेतली. तरी याचा काँग्रेसच्या विजयावर परिणामाची शक्यता नव्हती. दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेसच्या ३२ सदस्यांची व्यवस्था कळमेश्वरमधील एका फार्महाऊसवर करण्यात आली होती. त्यांच्यासोबत शेकापचा एक व राष्ट्रवादीचे दोन सदस्यही होते. आज निवडणुकीसाठी या सदस्यांना तेथून थेट जिल्हा परिषदेत आणण्यात आले. भाजपकडे संख्याबळ नसतानाही अध्यक्षपदासाठी नीता वलके तर उपाध्यक्षपदासाठी कैलास बरबटे अर्ज दाखल करण्यासाठी सरसावले होते. मात्र नंतर भाजपाने दोघांची उमेदवारी मागे घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT