Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
विदर्भ

असा असणार आहे नितीन गडकरींनी सांगितलेला ‘स्टेट ऑफ आर्ट’ पूल...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भंडारा (Bhandara) येथे बायपास रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला जाताना नागपूर (Nagpur) -भंडारा जिल्ह्यांच्या सीमेवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या अंभोरा येथे वैनगंगा नदीवर पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या ‘स्टेट ऑफ आर्ट’ पूल या कामाची पाहणी केली. विदेशातील पर्यटकांना आकर्षीत करेल, असा हा पूर असणार आहे.

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी निर्माणाधीन पुलाची वैशिष्ट्य़े आणि व्ह्यूईंग गॅलरीचीही पाहणी केली. कन्हान, वैनगंगा, आम, मुर्झा व कोलार या पाच नद्यांचा संगम असलेल्या या ठिकाणी सुमारे १२७.५४ कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात येत आहे. पुलाची लांबी ७०५.२० मीटर असून १५.२६ मीटर रुंदी आहे. वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग यासोबतच परिसरातील पर्यटकांसाठी एक विशेष पर्यटनस्थळ म्हणूनही या पुलाचा विकास करण्यात येत आहे. या पुलाच्या परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही बाजूंचे फुटपाथ पॅनोरॅमिक लिफ्ट आणि जिने यांच्यासह उभारण्यात येत असून ते ३.० मीटर रुंद केले आहेत.

विदर्भातील मोठ्या सिंचन प्रकल्पांच्या ‘बॅकवॉटर’मध्ये हा प्रकल्प उभारण्यात येत असल्याने यावर मध्यवर्ती उंचीवर एक व्ह्यूईंग गॅलरी प्रस्तावित आहे. सेंट्रल गॅलरी आणि पायलॉन गॅलरीसह हे गॅलरी ब्रिज आरटीएलच्या तुलनेत ४० मीटरहून अधिक असून चैतन्येश्वर मंदिर परिसरासह आसपासच्या क्षेत्रातील उत्कृष्ट दृश्ये या पुलावरून पर्यटकांना पाहता येणार आहेत. तसेच डाऊनस्ट्रीममध्ये दूर असलेल्या नदीच्या दृश्यासह संपूर्ण ‘बॅकवॉटर’ जलाशय परिसर आणि टेकड्यांच्या दृष्यांचाही आनंद घेता येणार आहे.

अंभोरा ते भंडारा अंतर फक्त दहा मिनिटात..

पुलाच्या परिसरात पर्यटनस्थळाची क्षमता असल्याने आवश्यक सुविधांबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीने इतर सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या पुलामुळे नागपूर ते भंडारा गोंदिया ही वाहतूक सुगम व सुरळीत होऊन नागरिकांना सुविधा होईल. तसेच अंभोरा ते भंडारा हे अंतर पार करण्यासाठी लागणारा दीड तासाचा वेळ कमी होऊन आठ ते दहा मिनिटात पोहोचणे शक्य होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT