Congress Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : चंद्रपुरातून आठ, तर गडचिरोलीतून नऊ काँग्रेसनेत्यांचे अर्ज

Congress : जिल्हाध्यक्षांनी पाठविली इच्छुकांची नावे; अनेक दावेदारांनी अद्यापही उघडले नाहीत पत्ते

संदीप रायपूरे

Chandrapur Politics : देशात आगामी दोन महिन्यांत लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची तयारी राज्यात सर्वत्र सुरू झाली आहे. मागील निवडणुकीत पूर्णपणे बॅकफूटवर असलेली काँग्रेस पुन्हा एका नव्या दमाने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारीनिशी मैदानात उतरली आहे.

काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. चंद्रपुरातून आठ, तर गडचिरोली लोकसभा क्षेत्रातून नऊ उमेदवारांनी आपले अर्ज पक्षाकडे सादर केले आहेत. लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त करीत भाजपची सत्ता हिसकाविण्यासाठी काँग्रेसने देशभरात कंबर कसली आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांची मोट बांधत काँग्रेस इंडिया आघाडीच्या माध्यमातून भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. अशात प्रत्येक लोकसभेची जागा ही त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. नागपुरात नुकताच काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी काँग्रेसच्यावतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यातून काँग्रेस कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे.

चंद्रपूर लोकसभेची जागा काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाची आहे. गेल्या निवडणुकीत संपूर्ण राज्यात काँग्रेसचे पानिपत झाले. अशावेळी बाळू धानोरकर यांच्या रूपाने राज्यातील एकमेव खासदार चंद्रपूरने काँग्रेसला दिला होता. धानोरकर यांनी भाजपच्या हंसराज अहिर या मातब्बर नेत्यांचा पराभव केला होता. सात महिन्यांपूर्वी खासदार बाळू धानोरकर यांचे आजाराने निधन झाले. त्यावेळी या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक घेणे टाळले.

आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्याकडे एकूण आठ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शंतनू धोटे, शिवा राव, प्रकाश देवतळे, डॉ. हेमंत खापने या आठ उमेदवारांचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोलीत एकून नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. या उमेदवारांनी लोकसभेची उमेदवारी मागितली आहे. माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, काँग्रेसचे महासचिव डॉ. नामदेव किरसान व इतर सहा उमेदवारांचा यात समावेश आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी ही माहिती दिली.

गडचिरोली लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन टर्मपासून भाजपचे अशोक नेते हे निवडून आले आहेत. यावेळी भाजप त्यांच्यावरच दाव लावू शकते. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा अत्राम हेदेखील लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबतचे सूतोवाच केले होते. त्यामुळे गोंदियातील जागेवर काँग्रेसकडून कोणता उमेदवार मिळणार, हे महत्त्वाचे ठरेल.

Edited by : Prasannaa Jakate

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT