Goras Bhandar : अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अन्न विभागाने विदर्भात अत्यंत मोठी आणि धक्कादायक कारवाई केली आहे. वर्धा शहराची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख असलेल्या मे. वर्धा तहसील गो दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्या (गोरस भंडार, मगनवाडी) उत्पादन केंद्रावर प्रशासनाने रविवारी (३१ मे) अचानक छापा टाकला. या कारवाईत २५ लाखांहून अधिक रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून, संस्थेला पुढील उत्पादन तातडीने थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अस्वच्छता आणि भेसळीच्या संशयावरून कारवाई
अन्न व औषध प्रशासनाच्या नागपूर कार्यालयाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. नागपूर आणि वर्धा येथील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे पथकाने मगनवाडी येथील 'गोरस भंडार'ला अचानक भेट दिली. यावेळी कारखान्यामध्ये अस्वच्छता असल्याचे, अन्नपदार्थांच्या उत्पादनासाठी अयोग्य वातावरण असल्याचे आढळून आले. तूप, ताक आणि खवा या पदार्थांचा साठा असुरक्षित ठिकाणी ठेवल्याचे निदर्शनास आले. यामुळे पथकाने २५ लाखहून अधिक रुपयांचा साठा जप्त केला.
या कारवाईनंतर संस्थेला अहवाल येईपर्यंत उत्पादन थांबवण्याचे आणि बाजारात विक्रीसाठी पाठवलेले पदार्थ परत मागवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय विक्रीसाठी ठेवलेले गाईचे दूध, तूप, ताक आणि खवा यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संस्थेला यापूर्वीही कमी दर्जाचे अन्नपदार्थ विकल्याप्रकरणी या पेढीला ५०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता, असे विभागाने सांगितले.
६०० दूध उत्पादक संकटात; ५००० ग्राहकांचे दूध पुरवठा ठप्प
दरम्यान, या कारवाईमुळे एका बाजूला प्रशासनाने कडक पाऊल उचलल्याचे दिसत असले, तरी दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यपूर्व काळापासून गांधीवादी विचारधारेवर चालणाऱ्या या ऐतिहासिक संस्थेवरील कारवाईमुळे वर्धेकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. 'गोरस भंडार' संस्था अचानक बंद झाल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या एका कारवाईमुळे संस्थेवर अवलंबून असलेली संपूर्ण साखळी विस्कळीत झाली आहे:
जिल्ह्यातील अंदाजे ६०० दूध उत्पादक शेतकरी या संस्थेला दररोज ९ हजार लिटर दूध ४२ रुपये प्रतिलिटर दराने विकत होते. अचानक संकलन बंद झाल्यामुळे या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. शहरात गोरस भंडारची ११ केंद्रे आहेत. ३३ वितरकांच्या माध्यमातून दररोज ५ हजारांहून अधिक ग्राहकांच्या घरांपर्यंत पोहोचणारे दूध आता पूर्णपणे बंद झाले आहे. संस्थेचे उत्पादन सुरु न झाल्यास हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
वर्धेकरांचा तीव्र संताप
प्रशासनाच्या या कारवाईनंतर वर्ध्यातील नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. शहरातील बड्या स्वीट मार्ट्स आणि खाजगी डेअरींमध्ये होणाऱ्या भेसळीकडे प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करते, मात्र शेतकऱ्यांचा आधार असलेल्या आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गोरस भंडारला केवळ आकस आणि सूडबुद्धीने लक्ष्य केले जात आहे, असा आरोप स्थानिक करत आहेत.
१५ गावांतील शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा:
या कारवाईच्या निषेधार्थ १५ गावांतील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. तसेच वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांना निवेदन देऊन, गोरस भंडारवरील कारवाई मागे घेण्याची आणि केवळ आकसापोटी कारवाई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
"जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही" – तुकाराम मुंढे
या वादावर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, "नागरिकांना शुद्ध अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. त्यात कोणी भेसळ केल्यास किंवा असुरक्षित वातावरणात अन्न बनवल्यास कठोर कारवाई केली जाईल. जनतेच्या आरोग्याशी खेळ अजिबात सहन केला जाणार नाही." तसेच नागरिकांना अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास नाव, पत्ता आणि मोबाईल नंबरसह अन्न व औषध प्रशासनाकडे थेट तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.