Dispute in Buldhana BJP at Mehekar. Sarkarnama
विदर्भ

Buldhana : एकीकडे भाजपचा जल्लोष, दुसरीकडं पक्षाच्या दोन गटांत तुफान राडा

जयेश विनायकराव गावंडे

Mehekar News : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. तालुकाध्यध्यक्ष निवडीवरून दोन गटांत रविवारी (ता. 3) चांगलाच राडा झाला. तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर एकीकडे भाजप कार्यकर्ते जल्लोष करीत असताना मेहकरमध्ये याच पक्षातील दोन गटांतील सदस्यांनी एकमेकांचं रक्त काढलं.

मेहकरात दोन गट आपसात भिडले. भाजप पदाधिकाऱ्यांनी भाजप विधानसभा संपर्क प्रमुखांना लोखंडी रॉडने मारहाण केली. ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनाही जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदविण्यास सुरुवात केली. (Two Groups Of BJP Clashed At Mehkar In Buldhana District Four Injured)

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे विधानसभा संपर्क प्रमुख प्रकाश गवई यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद होणार होती. त्यापूर्वी प्रल्हाद अन्ना लष्कर आणि शिव ठाकरे यांच्यासह 20 ते 25 लोकांनी प्रकाश गवई आणि अर्जुन वानखेडे, सारंग माळेकर यांच्यावर हल्ला चढवला. हल्ला करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. तालुकाध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून हा वाद असल्याचं सांगण्यात येत आहे. एकाच तालुक्यात दोन अध्यक्षांची निवड झाल्यानंतर वादाला सुरुवात झाली.

प्रकाश गवई यांच्या कार्यालयात घुसल्यानंतर दुसऱ्या गटातील पदाधिकाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्याची एकाने पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्यामुळे वाद आणखी चिघळला. त्यानंतर कार्यालयात जमलेल्या 20 ते 25 जण आपसात भिडले. एकमेकांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. कार्यालयात घुसलेल्या दुसऱ्या गटातील भाजप पदाधिकाऱ्यांनी हाती जे सापडले त्यानं मारहाण केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मारहाण करणाऱ्या दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी या प्रकारचे व्हिडिओही शूट केले. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. मेहकर भाजपमधील हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलंय. सायंकाळी उशिरापर्यंतय या घटनेमुळं मेहकर शहरात तणावाचं वातावरण होतं. दोन्ही गटांतील नेत्यांनी पोलिस ठाणे गाठत एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या आहेत. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही, असं मेहकर पोलिसांनी ‘सरकारनामा’शी बोलताना स्पष्ट केलं.

पदाधिकाऱ्यांमधील वाद चिघळल्याच्या या प्रकरणाबाबत स्थानिक नेत्यांनी प्रदेश पातळीवर माहितीही कळविली आहे. पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यातही गटातटाचे राजकारण भाजपमध्ये चांगलेच धुमसत आहेत. फरक तो एवढाच की बुलडाण्यातील वाद मारहाणीपर्यंत पोहोचला आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT