Nagpur Winter Session 2023 Sarkarnama
विदर्भ

Samant Vs Mhatre: तुम्ही 'त्या' रस्त्यावरुन कधी गेलात का? म्हात्रे-सामंतांमध्ये रंगली जुगलबंदी

शर्मिला वाळुंज

Dombivli: अंबरनाथ तालुक्यातील वसार गावातील एमआयडीसी भूसंपादनाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजला. भाजपा आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी हा विषय अधिवेशनात उचलत शिवसेनेचे नेते, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधत शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी केली. यावरून सत्ताधारी दोन्ही आमदारांमध्ये खडाजंगी झाली.

भाजपचे विधान परिषदेचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सभापती निलम गोऱ्हे यांच्यासमोर हा विषय मांडला.मलंगगड परिसरातील अंबरनाथ येथील मौजे वसार गावातील शेतकरी वायले याने बदलापूर पाईपलाईन रस्ता अडविला आहे. ही जागा भूसंपादित केलेली नाही म्हणून त्याने त्याठिकाणी रस्ता अडवून त्याने त्याठिकाणी शेती केलेली आहे. याकडे मी मंत्री सामंतांचे लक्ष वेधू इच्छितो, असे म्हात्रे यांनी उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे बघत सांगितले.

सामंत यांनी म्हात्रे यांना आपण कधी त्या रस्त्यावरुन गेलात का असा प्रश्न केला.यावर म्हात्रे यांनी नेहमीच जातो असे सांगत हसत प्रतिउत्तर दिले. ते म्हणाले रस्ता अडविल्याने तेथे अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचे मत ऐकून घ्यावे व त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले. उदय सामंत यांनी म्हात्रे यांच्याकडे पाहत सन्माननीय महोदयांनी भावनेच्या भरात या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना मी स्वतः बोलावून घेतले होते. त्यांना पर्यायी जागा देखील उपलब्ध करून दिलेली होती. परंतु एखाद्या लोकप्रतिनिधींनीच त्यांना पाठिंबा देऊन एखाद्या रस्त्यावर शेती करणे योग्य नाही. (अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना टोला लगावला) त्याच्यावर आम्ही आता कायदेशीर कारवाई करत आहोत, असे सांगितले.

वसार गावातल्या शेतकऱ्यांची जमीन एमआयडीसीने सुमारे 50 वर्षांपूर्वी पाईपलाईन टाकण्यासाठी संपादित केली होती. या भूसंपादनात तफावत आढळली आहे. हक्काच्या जागेसाठी वसार गावातील स्थानिक शेतकरी अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. एमआयडीसीकडे वारंवार खेट्या घालूनही यावर काही तोडगा निघत नसल्याने साधारण 9 महिन्यांपूर्वी वसार गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या जागेतील बदलापूर पाईपलाईन महामार्गावरील नेवाळी नाका मार्गे जाणारी मार्गिका बंद केली आहे.

या डांबरी मार्गावर शेतकऱ्यांनी शेती करत त्यातून भाज्यांचे उत्पन्न देखील घेतले आहे. महिनो महिने ही एक मार्गिका बंद असल्याने येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यावर अद्याप कोणताही परीपूर्ण असा तोडगा निघालेला नाही.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT