Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Uddhav Thackeray And MVA : काँग्रेसच्या महिला नेत्याचं मोठं विधान; म्हणाल्या, ...म्हणून उद्धव ठाकरेंनीच पुन्हा मुख्यमंत्री व्हावं!

Congress Leader On Mahavikas Aaghadi CM Face : विधानसभा निवडणुकीत नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी लाखोंचा खर्च केला जात असल्याचा आरोपही काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला. तसेच विरोधकांकडून मोठी होर्डिंग्ज लावत सरकारचे गोडवे गायले जात आहे.

Deepak Kulkarni

Congress News : विधानसभा निवडणुकांचं काऊंटडाऊन आता सुरू झालं आहे. महायुतीतील भाजपनं आपल्या 99 उमेदवांराची पहिली यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागावाटपावरुन प्रचंड घमासान सुरू असल्याची चर्चा आहे.

त्यातच विदर्भातील काही जागांवरुन महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा आहे.पण आता याचवेळी महाविकास आघाडीच्या गोटातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

महायुतीकडून वारंवार चॅलेंज करुन, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आग्रह केल्यानंतरही महाविकास आघाडीने अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. पण आता निवडणुकीच्या तोंडावर थोडं समझोत्याची भूमिका घेत उद्धव ठाकरेंनीही सरतेशेवटी आता मविआने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याला आपला पाठिंबा असेल असं विधान करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

यातच आता काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. उद्धव ठाकरेच मुख्‍यमंत्री व्‍हावेत,असं काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

अमरावतीमध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी (ता.20) महाविकास युवा आघाडीचा मेळावा बोलावण्यात आला होता. या मेळाव्यात काँग्रेसच्या (Congress) महिला नेत्या यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर रोखठोक भाष्य केलं आहे.

त्या म्हणाल्या,उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची पाच वर्षे पूर्ण करायला हवी होती, ही माझ्या मनातली इच्छा सांगतेय. माझं वैयक्तिक मत असं आहे की, पुढच्या काळात त्यांनीच त्या ठिकाणी विराजमान व्हावं. आम्ही तुमच्यासोबत आहोत,अशीही भूमिकाही ठाकूर यांनी मांडली.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, उद्धव ठाकरेंनी का नाही मुख्यमंत्री व्हायला हवं.बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव मुख्यमंत्री झाले.ते तुम्हाला सहन नाही झालं, तर काय होणार, असा सवाल उपस्थित केला. तसेच जो 50 कोटी घेऊन स्वतःच्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसतो, तो जनतेचा काय होणार आहे. आताच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं अशी विचारणा करतानाच विरोधकांवर यशोमती ठाकूर यांनी टीकेची झोड उठवली.

यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना देश विघातकी शक्तीच्या विरोधात पुन्हा पेटून उठण्याची वेळ आली असून विजय आपलाच असला तरी ही लढाई मोठी असल्याने कुणीही गाफील राहू नये असा सल्लाही दिला.

विधानसभा निवडणुकीत नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी लाखोंचा खर्च केला जात असल्याचा आरोपही काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला. तसेच विरोधकांकडून मोठी होर्डिंग्ज लावत सरकारचे गोडवे गायले जात आहे.

पण ही विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप मित्रपक्षांकडून उधळल्या जात असलेला हा पैसा जनतेच्या घामाचा पैसा आहे असा हल्लाबोलही त्यांनी केला.त्यामुळेच आघाडीच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी सर्व भेद विसरून एकजुटीने काम करावे असं आवाहनही यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT