Shivsena UBT News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन' टायगरमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाला मोठे खिंडार पडले. विकास निधीचे कारण सांगत 6 खासदारांनी शिंदे यांच्या नेतृत्तवात शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर पक्षाला बळकटी देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. यवतमाळ बाजार समितीच्या आवारात उद्धव ठाकरे यांची पहिली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी फुटीर खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघात जाऊन मतदारांची माफी मागितली.
सभेच्या प्रारंभी ठाकरे यांनी यवतमाळकरांची माफी मागत खासदार संजय देशमुख यांच्या पक्षांतरावर टीका केली. शिवसेना प्रमुखांच्या नावावर आणि माझ्या शब्दावर तुम्ही त्यांना निवडून दिले, मात्र त्यांनी जनतेच्या विश्वासाला तडा दिला, असे ते म्हणाले. मागीलवेळी ४० आमदार मिंदेनी नेले. आता सहा खासदार पुन्हा पळवून नेले आहे. पूर्वी आमदारांचा भाव ५० खोके होता, आता खासदारांचा भाव किती असेल, असाही टोला लगावत त्यांनी पक्षांतराच्या राजकारणावर निशाणा साधला.
यवतमाळ येथील सभा झाल्यानंतर उद्धव ठाकरे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले. यावेळी त्यांनी वाशिम मतदारसंघातून विधानसभा उमेदवाराची घोषणाच केली. आता फक्त खासदार नाही तर वाशिमचा आमदारही आपलाच पाहिजे. यासाठी आतापासूनच कामाला लागा असे म्हणत डॉ. सिद्धार्थ देवळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. 2024 मधील निवडणुकीत देवळे यांचा थोडक्यात पराभव झाला पण त्यांनी तब्बल 1 लाख 4 हजार मते घेतली होती.
ऑपरेशन टायगरनंतर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपल्याची टीका सत्ताधाऱ्यांसह शिवसेनेतील मंत्री आणि नेत्यांकडून केली जात आहे. यावर उत्तर देण्यासह फुटीर खासदारांच्या विरोधात रान उठवण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून ते विदर्भाच्या दौऱ्यावरून असून आज यवतमाळ- वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघात जाऊन जोरदार टीका केली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी, पक्ष चोरला चिन्ह चोरला, पण ठाकरे आहे त्या जागी उभा आहे. ज्या आईची शपथ घेऊन हे गद्दारी करणार असतील तर आईला काय वाटत असेल. याने आधीच आपल्याशी गद्दारी केली होती तरी पण पुन्हा आले. मोदींची लाट असताना भाजपच्या छाताडावर बसून महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले, ज्यात आपलेही खासदार होते.
माझ्या शब्दावर जनतेने काहीही विचार न करता या खासदारांना निवडून दिले. त्यांनीच आज विश्वासघात केला. याबद्दल मी जनतेची माफी मागणार असून यासाठीच येथे आलो आहे. पण फुटणारे फुटले, ते गेले. मात्र जे निष्ठावंत राहिले ते माझे कार्यकर्ते, ते शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते. यामुळे अशा गद्दारांचे जाणंच योग्य झालं. शिवाय गद्दार जेव्हा आपल्या समोर येतील तेव्हा त्यांना तुडवू नका तर जाब विचारा. त्यांना गद्दारी का केली? हे विचारा. तर पुढील तीन वर्षे हाच कार्यक्रम असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ठाकरे यांनी येथील किड गाडून ठेचून टाकायसाठी कामाला लागा असे आदेश दिले आहेत. तर याच्याआधी येथे मतदारसंघात खासदाराची खालच्यांशी सेटिंग व्हायची. खाली तू वरती मी. तर खलाचाही तशीच सेटींग करत वरती मी खाली तू. पण आता मला आता खाली वरती काय नाही, आमदार पण पाहिजे आणि खासदार ही. तेथे आता डॉ. सिद्धार्थ देवळेच आमदार व्हायला हवा. याची जबाबदारी तुमची असून गेल्यावेळी एक लाख चार हजार मते पडली पण आता पुढच्या वेळेला देवळे यांना आमदार करा असेही आवाहन देखील केले आहे.
तसेच, डॉ. सिद्धार्थ देवळे किती मत मिळाली होती? आतापासूनच तुम्ही तयारीला लागा, तीन वर्ष तुमच्या हातात आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकप्रकारे सिद्धार्थ देवळेंची उमेदवारीच जाहीर केली. दरम्यान, नुकताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत वाशिम मतदारसंघातून सिद्धार्थ देवळेंना शिवसेना-महाविकास आघाडीकडून तिकीट देण्यात आले. मात्र, सिद्धार्थ देवळेंचा भाजपच्या श्याम खोडे यांच्याकडून निसटता पराभव झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.