Ad. Ujwal Nikam News, Shivsena Latest Marathi News, Nagpur News
Ad. Ujwal Nikam News, Shivsena Latest Marathi News, Nagpur News Sarkarnama
विदर्भ

Shivsena: शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे, हा वाद निवडणूक आयुक्त सोडवू शकतात !

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : भारतीय घटनेनुसार राज्यपाल दुसऱ्या मोठ्या राजकीय पक्षाला निमंत्रण देऊ शकते. दुसरा मोठा पक्ष म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून ज्यांनी राज्यपालांना निवेदन दिले होते, ती असू शकते. परंतु आता महाविकास आघाडीचे सरकार न राहिल्यामुळे निवडणुकीत निवडून आलेला जो सर्वात मोठा पक्ष आहे, म्हणजे भारतीय जनता पक्षाला राज्यपाल सरकार बनवण्यासाठी आमंत्रण देऊ शकतात. काही दिवसांची मुदत देऊन तुम्ही तुमचं बहुमत सिद्ध करा, असं सांगण्याची शक्यता असल्याचे ॲड. उज्वल निकम आज येथे म्हणाले. (Shivsena Latest Marathi News)

नागपुरातील (Nagpur) रवी भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना ॲड. निकम (Ad. Ujwal Nikam) म्हणाले, जोपर्यंत नवीन सरकार अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत काळजीवाहू सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) राज्यकारभार बघण्यासाठीदेखील राज्यपाल (Governor) सांगू शकतात. यानंतर ज्या कुणाचे सरकार बनेल, मुख्यमंत्री (Chief Minister) होतील, त्यांना सरकार बनवण्याइतपत बहुमत विधिमंडळात सिद्ध करावं लागेल. पण आज महाराष्ट्रातील कोणत्याही एका राजकीय पक्षाची स्थिती अशी नाही, की जे संख्याबळाच्या आधारावर सरकार बनवू शकतील. त्यांना काही आमदारांचा, विधिमंडळाच्या सदस्यांचा पाठिंबा घ्यावा लागेल. यामध्ये शिवसेनेतून बाहेर पडलेले आमदार, जे की बाळासाहेब शिवसेना संबोधत आहेत, त्यांचा पाठिंबा घ्यावा लागेल आणि त्या जोरावर सरकार बनवानी लागेल.

मूळ शिवसेनेतून बाहेर पडलेले जे बंडखोर आमदार आहे, त्यांना एखाद्या राजकीय पक्षात विलीन व्हावं लागेल, असे काही नाही. कारण जे मूळ शिवसेनेतून बाहेर पडलेले जे आमदार आहेत, ते म्हणत आहेत की, आम्ही शिवसेनेतून बाहेर गेलेलो नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला घेऊन चालत आहोत. हिंदुत्वाचा मुद्दा आम्हाला भाजपच्या सोबत मिळून पुढे न्यायचा आहे. ते शिवसेनेतून फुटले, असं मानायला ते तयार नाहीत. म्हणून आपला वेगळा गट तयार करून शिवसेना बाळासाहेब, असं ते स्वतःला संबोधत आहेत. विधिमंडळात ते वेगळा गट म्हणून बसतील, की राजकीय पक्षात विलीनीकरण करतील, हे दोन वेगवेगळे प्रश्‍न आहेत. बंडखोर गट दुसऱ्या राजकीय पक्षात विलीनीकरण करण्याची शक्यता कमी आहे. कारण त्यांचं वेगळं अस्तित्व राहणार नाही आणि मतदारांना शिवसैनिक आहोत, असं सांगून ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे मतदारांना धोका दिला, असं वाटण्याची शक्यता ॲड. निकम यांनी वर्तविली.

आम्ही वेगळा गट आहोत आणि शिवसेनेच्या मूळ विचारांचे पाईक आहोत, असे बंडखोरांचा गट म्हणतो आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन वेगळे गट आता बघायला मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि बाळासाहेब शिवसेना, असे दोन गट पुढील काळात कार्यरत असण्याची शक्यता जास्त आहे. शिवसेनेच्या घटनेनुसार शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्या पक्षाचं कॅडर संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेलं आहे. जरी शिंदे गट म्हणत असला की, आम्ही बाळासाहेब शिवसेना आहे, तरीही शिवसेनेवर त्यांचा कब्जा होऊ शकत नाही. कारण पक्षाच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे यांची शिवसेना, हीच खरी शिवसेना असल्याचे त्यांनी नमूद केले.

एकनाथ शिंदे गटाने जर मूळ शिवसेनेवर दावा केला, तर हा प्रश्‍न मग निवडणूक आयुक्तांकडे जाऊ शकतो. ज्यावेळी कॉंग्रेस फुटली आणि इंदिरा कॉंग्रेस आणि संघटना कॉंग्रेस, असे दोन भाग झाले, त्यावेळीसुद्धा हा वाद निवडणूक आयुक्तांकडे पोहोचला. मग चिन्हावरून वाद झाला आणि तेव्हा एकसंघ कॉंग्रेसचे बैलजोडी हे राजकीय चिन्ह होते, ते नंतर गायवासरू झाले आणि नंतर मग पंजा आला. हा वाद निवडणूक आयुक्तांकडे सोडविला जाऊ शकतो, असे ॲड. ऊज्वल निकम म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT