Maharashtra Assembly Winter Session : हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र आज नागपूरच्या न्यासाच्या भूखंड घोटाळ्यावरुन सभागृह प्रचंड गाजलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नागपूरच्या न्यासाच्या भूखंड घोटाळ्यावरुन विरोधकांनी गंभीर आरोप करत मुख्यमंत्री शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना नागपुरातील एनआयटीची जमीन बिल्डरांना अत्यंत कमी दरात देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. शिंदे यांनी तब्बल ८६ कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या २ कोटी रुपयांना दिल्याचं विरोधकांनी म्हटलं.
तर नागपुरातील (Nagpur) एनआयटी भूखंड प्रकरणावरून आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील मैदानात उतरले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे.
याविषयावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ''एवढा जुना विषय एवढी वर्ष कोर्टात सुरु होता आणि कोर्टाने स्थगिती दिली. ज्या गोष्टीला न्यायालयाने स्थगिती दिली, ती देताना न्यायालयाने म्हटलं की विषय न्यायप्रविष्ठ असताना सरकारने यात हस्तक्षेप केला. ज्या खात्याचा हा विषय आहे त्या खात्याचे मंत्री अजूनही पदावर कायम आहेत. तसेच ते राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत. त्यामुळे सरकारकडून कशी बाजू मांडायची याबाबत यंत्रणेवर दबाव येऊ शकतो'', असं ते म्हणाले.
'' मात्र या प्रकरणाची चौकशी पारदर्शक व्हायला हवी. त्यामुळे या चौकशी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. चौकशी होईपर्यंत कुणीही त्या पदावर राहू नये. एवढंच नाही तर कायद्यानुसार काम झालं असेल तर कोर्टाने स्थगिती का दिली?'' असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तर या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं असून नियमानुसारच या जमिनीचा व्यवहार झाला. कोर्टाने ताशेरे ओढलेले नाहीत. तर मी माझ्या अधिकाराचा गैरवापर केलेला नसून NIT भूखंड प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.
दरम्यान, विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये काही वेळ शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.