Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Thackeray On Fadnavis: उद्धव ठाकरेंची नागपूरमध्ये जोरदार बॅटिंग; भर सभेत फडणवीसांची क्लिप ऐकवत केला प्रहार

सरकारनामा ब्यूरो

Nagpur News : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून त्यांनी नागपूरमधील शिवसैनिकांना संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गट आणि राष्ट्रवादीवर (अजित पवार गट) जोरदार टीका केली.

याबरोबरच देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही...अशी एक व्हिडिओ क्लिप भर सभेत ऐकवत जोरदार हल्लाबोल केला. तसेच फडणवीसांची हालत बिकट झाली असून सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, असा निशाणाही ठाकरेंनी साधला. अजित पवार यांचे नाव न घेता विकास पुरुष असा उल्लेख करत त्यांनाही ठाकरेंनी डिवचलं.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

"विदर्भात शिवसेनेची मोठी ताकद आहे. कोण म्हणत विदर्भात शिवसेनेची ताकद नाही? आता पावसाळ्यात जाहीर सभा घेणार नाही. पण नागपूरमध्ये आपली महाविकास आघाडीची मोठी सभा झालेली आहे. मात्र, त्यानंतर आपण महाविकास आघाडीच्या सभा थांबवल्या. या सभा का थांबवल्या हे तुम्हाला माहित आहे. या पावसाळ्याच्या काळात मी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बोलत आहे. रविवारी मी यवतमाळ, दिग्रस, अमरावतीमध्ये शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं", असं त्यांनी यावेळी सांगितलं.

ठाकरेंची अजित पवारांवर नाव न घेता टीका

"कालपर्यंत आपल्या सोबत बसले होते, त्यांना (अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला) अचानक साक्षात्कार झाला आणि ते त्यांच्यासोबत (भाजपबरोबर) जाऊन बसले. मात्र, कालपर्यंत हेच त्यांना शिव्या देत होते, पण आज अचानक विकास पुरुष झाले. आज त्यांचा स्वत:चा विकास होतोय, देशाचा नाही", अशी टीका नाव न घेता उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर केली.

ठाकरेंनी साधला फडणवीसांवर निशाणा

देवेंद्र फडणवीस यांची हालत सध्या बिकट झालीय. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. आपण म्हणतो की, 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले,"असं म्हणत फडणवीस यांची एक क्लिप यावेळी सभेत त्यांनी ऐकून दाखवली. त्या क्लिपमध्ये फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की, राष्ट्रवादीशी युती होणं शक्यच नाही नाही नाही... एक वेळ सत्तेशिवाय राहू पण...राष्ट्रवादीबरोबर जाणार नाहीत, असं फडणवीस त्या क्लिपमध्ये म्हणतात. हीच क्लिप ऐकवत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT