INDIA Alliance : महाविकास आघाडीत समावेशावरून वंचित बहुजन आघाडीने सोशल मीडियावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी संदेश दिल्याच्या काही तासांनंतरच अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘इंडिया’ आघाडीत सहभागी होण्याबाबत मोठं विधान केलय.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथे आयोजित कार्यक्रमात अॅड. आंबेडकर यांनी ‘इंडिया’ आघाडीत ‘वंचित’चा प्रवेश होईल, असे संकेत दिले आहेत. शनिवारी (ता. 16) आयोजित एका कार्यक्रमासाठी ते बार्शीटाकळी येथे आले होते.
‘इंडिया’ आघाडीची महत्त्वाची बैठक गुरुवारी (ता. 19) होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीत अॅड. प्रकाश आंबेडकर यांची बाजू मांडणार आहेत. या बैठकीत नक्की ठरणार आहे की, ‘वंचित’ला आघाडीत घ्यायचं की वंचितच ठेवायचं. राष्ट्रीयस्तरावर ‘इंडिया’त आणि राज्यस्तरावर महाविकास आघाडीत सहभागी करून न घेतल्यास आपण निर्णय घेण्यासाठी मोकळे आहोत, असं अॅड. आंबेडकर म्हणाले.
उद्धव ठाकरे हे बैठकीत ‘वंचित’ची बाजू मांडणार असल्यानं नेमकं काय बोलायचय यावर चर्चा झाल्याचं अॅड. आंबेडकर यांनी सांगितलं. आपल्या विश्वास वाटतोय की, पक्षाचा समावेश आघाडीत होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशात जातीपातींमध्ये विष पेरत आहे. भविष्यात यामुळं घातक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशात संघ आणि भाजपला आताच रोखणं गरजेचं झालय. आत या दोघांनाही रोखलं नाही, तर ते बेलगाम होतील. त्यामुळं संघ आणि भाजपच्या विरोधात असलेल्यांसोबत लढण्यासाठी आपण आघाडीत जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचं अॅड. आंबेडकर म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
‘इंडिया’ आणि महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामुळं त्यांचा आघाडीत समावेश होत नसल्याचं सांगण्यात येत आहे. अशात अॅड. आंबेडकर यांनी मुंबईत आपल्या सभेचं निमंत्रण राहुल गांधी यांना पाठविलं होतं. तेलंगणा विधानसभा निवडणूक प्रचाराचं कारण पुढं करीत राहुल सभेला अनुपस्थित राहिले. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पुढं केलं. तत्पूर्वी ‘वंचित’ला सोबत घेण्यावरून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आडमुठे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे अॅड. आंबेडकर अद्यापही आघाडीपासून ‘वंचित’च आहेत. अशात गुरुवारचा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
अॅड. आंबेडकर यांना ‘इंडिया’ आघाडीत सहभागी करून न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवेल अशी सूचना वजा इशाराच पक्षानं शनिवारी सोशल मीडिया पोस्टमधून दिलाय. त्यासाठी मतांच्या विभाजनाचं गणितही मांडण्यात आलय. अशात आता अॅड. आंबेडकरांबाबत कोणता निर्णय आघाडीतील नेते घेतात, याची प्रतीक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.