Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे कळमेश्वरमधून सुरू करणार विदर्भातील निवडणुकीची रणधुमाळी!

Rajesh Charpe

Uddhav Thackeray on Malvan : मालवन येथे छत्रपतींचा पुतळा कोसळल्याची घटना ताजी असतानाच सावनेर विधानसभा मतदारसंघातील कळमेश्वर येथे एका खासगी संस्थेने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे रविवारी येणार आहेत. या निमित्ताने महाविकास आघाडीची सभासुद्धा आयोजित करण्यात आली आहे.

विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे कोणावर निशाना साधतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. सावनेरचे माजी आमदार व माजी मंत्री सुनील केदारांनी(Sunil Kedar) मात्र महाराष्ट्राच्या दैवताच्या पुतळ्याचे अनावरण असल्याने आतापासूनच यात ट्विस्ट शोधू नका असे आवाहन करताना प्रचाराची रणधुमाळी येथूनच सुरू होणार असल्याचेही संकेत दिले.

सावित्रीबाई फुले शिक्षण समाज शिक्षण संस्थेच्या आवारात छत्रपतींचा अश्वरुढ पुतळा उभारण्यात आला. पुतळ्याची उंची २५ फुंट उंच असून संस्था आणि लोकवर्गणीतून तो उभारण्यात आला आहे. पुतळ्याला शासनाने परवानगी दिली असून देखभालाची जबाबदारीसुद्धा संस्थेवर सोपवण्यात आली असल्याचे यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. येत्या रविवारी (ता.२९) सायंकाळी पाच वाजता उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

कार्यक्रमाची माहिती देताना केदार म्हणाले, उद्धव ठाकरे यांची ख्याती बोले तैसा चाले अशी आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याचे भाग्य मला लाभले. लोकसभा निवडणुकीच्यापूर्वीच या पुतळ्याचे अनावरण होणार होते. मात्र निवडणुकीच्या धामधुमीत ते शक्य होऊ शकले नाही. आता उद्धव ठाकरे यांनी वेळ दिली आहे. न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम यानिमित्ताने होत आहे.

विधानसभेची निवडणूक असल्याने उद्धव ठाकरे  पुढच्या रणागणाची सुरुवात करतील असा विश्वासही यावेळी केदारांनी व्यक्त केला. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरिया, उत्तम कापसे, देवेंद्र गोडबोले, सागर डबरासे आदी उपस्थित होते.

विशेष म्हणजे सुनील केदार यांच्या आग्रहावरून ठाकरे गटाने रामटेक लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी(Congress) सोडला होता. महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करून केदारांनी आपला शब्द खरा करून दाखवला. केदार यांच्याच विधानसभा मतदारसंघात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या सभेला मात्र केदार व अनिल देशमुख यांच्याशिवाय दोन्ही काँग्रेसच्या एकाही नेत्याला अद्याप आमंत्रित करण्यात आलेले नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT