Rajesh Mishra and Shivsena Partyworker's Sarkarnama
विदर्भ

Akola Protest : ठाकरेंच्या छाव्याने अकोल्यात पुन्हा पेटवली आंदोलनाची ‘मशाल’

Flyover Issue : उड्डाणपुलाच्या मुद्द्यावरून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न

जयेश विनायकराव गावंडे

Akola Political News : भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पासून फारकत घेतल्यानंतर उद्धव ठाकरे गट अकोल्यात चांगलाच आक्रमक झालाय. वेगवेगळ्या मुद्द्यांवर मोर्चे, धरणे, रास्ता रोको, होऊ द्या चर्चा अशी आंदोलनं करीत ठाकरे गट सत्ताधाऱ्यांची कोंडी करू पाहतोय. त्यातच ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांमागे आपला एक असा ‘छावा’ सोडलाय ज्यानं सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलनाची ‘मशाल’ चांगलीच पेटवलीय.

अकोला येथे कोट्यवधी रुपये खर्च करीत सुमारे वर्षभरापूर्वी उड्डाणपूल उभारण्यात आला. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे भाजपनं थाटात लोकार्पण केलं. पुलावरून २८ मे २०२२ पासून वाहतूक सुरू झाली. परंतु सहा महिन्यातच या उड्डाणपुलाला तडा गेला. १९ डिसेंबर २०२२ रोजी पूल खचल्यानं वाहतूक बंद करावी लागली. पूल बंद होताच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं अकोल्यात आंदोलन सुरू केलं. काँग्रेसच्या ग्रीन ब्रिगेडनंही आक्रमक भूमिका घेतली. सहा महिन्यातच उड्डाणपूल बंद पडल्याची नामुष्की ओढवल्यानं भाजपची चांगलीच गोची झाली.

सत्ताधारी पुलाच्या दुरूस्तीसाठी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या पाठीमागे धावत होते. अभियंत्यांनीही दुरुस्ती केली आणि पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला. उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होताच ठाकरे गटाचे नेते राजेश मिश्रा यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं. अत्यंत थातुरमातुर पद्धतीनं ही दुरूस्ती करण्यात आली असून त्यामुळं अपघात घडू शकतो असं त्यांचे म्हणणं आहे. त्यामुळं शुक्रवारी (ता. २७) मिश्रा आणि त्यांच्या समर्थकांनी उड्डाणपुलावर ‘हा पहा भाजपचा भ्रष्टाचार’ असे लिहुन भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. बराचवेळपर्यंत अशोक वाटिका चौकात हे आंदोलन सुरू होतं. या मार्गावरून जाणे-येणे करणाऱ्या प्रत्येकाचेच आंदोलकांनी लक्ष वेधलं. मिश्रा यांच्यासह अकोला पूर्व शहरप्रमुख राहुल कराळे, अतुल पवनीकर, मंगेश काळे, गजानन बोराळे, देवेश्री ठाकरे, श्याम पांडे या आंदोलनात सहभागी झालेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अकोला आणि अकोटला जोडणारा पूर्णा नदीवरील पूलही पहिल्याच पुरामुळं वाहुन गेला. गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील इंग्रजकालीन पूल कालबाह्य झाल्याने बंद करण्यात आला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणुन जवळच छोटा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल बांधण्यासाठी देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या विकास निधीतून चार कोटी रुपये मंजूर केले होते. या मुद्द्यावरही ठाकरे गटानं चांगलंच रान पेटवलं आहे. गडकरींनी जे दिलं ते अकोल्यातील नेते टिकवू शकले नाही, अशी टीका आता जनतेतूनही होत आहे.

उड्डाणपूल खचण्याचे कारण

अकोल्यातील उड्डाणपुलासाठी सुमारे १६० कोटी रुपये खर्च झाला आहे. पुलाखालुन ६०० मिलिमीटर व्यासाची मोठी जलवाहिनी गेली आहे. या जलवाहिनीचा अंदाज न घेताच हा पूल उभारण्यात आला. अचानक एक दिवस जलवाहिनी फुटली व उड्डाणपुलाचा भराव वाहुन गेल्याने पूल खचला. पुलाची दुरुस्ती करताना त्याच्यात जुने तुटलेले ब्लॉक बसविण्यात आल्याचा आरोप होत आहे.

(Edited by : Prasannaa Jakate)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT