Sandeep Gawai Banar  Sarakarnama
विदर्भ

Sandip Gawai News : उमरेडवरुन टफ फाईट; दोन पारवेंच्या लढाईत संदीप गवईंनी घेतली उडी

Rajesh Charpe

Nagpur News : शहरात एकेकाळी पोस्टर बॉय अशी ओळख असलेले भाजपचे माजी नगरसेवक संदीप गवई हे पुन्हा एकदा पोस्टरवर झळकू लागले आहेत. यावेळी ते उमरेड विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्याने ते येथून लढणार आहेत का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र त्यांच्या सक्रियतेने भाजप आणि शिवसेनेच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

संदीप गवई यांनी महापालिकेसोबतच यापूर्वी उमरेड विधानसभा आणि भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची निवडणूक लढली आहे. विधान परिषदेत ते भाजपचे अधिकृत उमेदवार होते. उमरेडमध्ये ते स्वबळावर लढले होते. त्यावेळी त्यांनी 28 हजार मते घेतली होती. ती बंडखोरी होती की भाजपचा (Bjp) बी प्लान याचा खुलासा आजवर कोणीच केला नाही. गवई यांच्यावरसुद्धा भाजपने कारवाई केली नाही. उलट नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली होती. (Sandip Gawai News)

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadakri) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी चांगला ताळमेळ ठेवला आहे. उत्तर नागपूर आणि उमरेड या दोन्ही विधानसभा मतदारसंघात त्यांच्या नावाची सतत चर्चा असते. गवई यांनी लाडकी बहीण योजना आणल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करणारे फलक उमरेडभर लावले आहेत. हे बघता त्यांनी उमरेड विधानसभा मतदारसंघाकडे आपला मोर्चा वळवल्याचे बोलते जात आहे. सध्या त्यांच्या पोस्टरची जोरात चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरू आहे.

उमरेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे तयारीला लागले आहेत. दुसरीकडे कालपर्यंत काँग्रेसमध्ये असलेले माजी आमदार राजू पारवे शिवसेनेते दाखल झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे.

आमदार कृपाल तुमाने यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. सुधीर पारवे येथून दोन वेळा निवडून आले होते. त्यामुळे ही जागा भाजप सहजासहजी सोडण्याची शक्यता दिसत नाही. भाजप आणि शिंदे सेनेत उमरेडसाठी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आमदार आमचा त्यामुळे जागाही आमची असे शिवसेनेचे म्हणणे आहे. राजू पारवे हे काँग्रेसचे आमदार असल्याने शिंदे सेनेचा दावा हास्यास्पद असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. पारवे विरुद्ध पारवे असा संघर्ष सुरू असताना संदीप गवई यांनी येथे उडी घेऊन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT