Sujat Ambedkar  Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : सुजात आंबेडकर यांना उमेदवारीसाठी अमरावतीत ठराव

Vanchit Bahujan Aghadi : ‘वंचित’च्या मागणीमुळे महाविकास आघाडीसह काँग्रेसला पुन्हा भरली धडकी. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाचा नवा ‘फंडा’

जयेश विनायकराव गावंडे

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे त्यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांना अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठराव घेऊन तशी मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यंदाच्या निवडणुकीत आघाडी-युती यातील जागावाटपावरून सध्या जोरात चर्चा सुरू आहे. असे असतानाच इच्छुकांकडूनही मतदारसंघात मोर्चेबांधणी केली जात आहे. विदर्भातील सर्वांत महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. या मतदारसंघात नेमके काय गणित असणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार, याचा अद्यापही निर्णय झालेला नाही. महायुतीतही या मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून रस्सीखेच सुरू आहे. महायुतीत नवनीत राणा, आनंदराव अडसूळ यांच्या नावाची चर्चा आहे. अमरावती हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा प्रभाव आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमरावती मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी लोकशाही गौरव महासभेच्‍या माध्‍यमातून केलेल्‍या शक्तिप्रदर्शनामुळे चर्चांना उधाण आली होते. याच सभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपपेक्षा काँग्रेसवर केलेला टीकेचा मारा, स्‍वबळावर लढण्‍याची दर्शविलेली तयारी यातूनच आंबेडकरांनी काँग्रेससमोरील अडचणी वाढविल्‍या होत्या. आता पुन्हा अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आल्याने काँग्रेसला सुरुंग लावण्याची खेळी ‘वंचित’कडून खेळली तर जात नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एकीकडे सध्या वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीच्या समावेशाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, महाविकास आघाडी आणि ‘वंचित’मध्ये अद्यापही जागावाटपाचे अद्यापही ठरले नाही. असे असतानाचा प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार काँग्रेससह महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे अकोला लोकसभा मतदारसंघात स्वतःची उमेदवारी आंबेडकरांनी सुरुवातीलाच जाहीर करून काँग्रेसला कोंडीत पकडले. आता अमरावतीच्या उमेदवारीवरही आंबेडकर यांच्या ‘वंचित’चा आता डोळा आहे का? अशी चर्चाही होत आहे. एकीकडे महाविकास आघाडी आणि ‘वंचित’मधील आघाडीचे घोडे अडले असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी त्याची वाट न पाहता राज्यातील अकोल्यासह तीन मतदारसंघात उमेदवार जाहीर केल्याची चर्चा होती. आंबेडकर हे अकोला लढण्यावर ठाम आहेत. अकोलानंतर अमरावतीमधून सुजात यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी समोर आल्याने काँग्रेस पुन्हा एकदा कोंडीत सापडली आहे. वंचित बहुजन आघाडीने पूर्वीच शक्तिप्रदर्शन करून काँग्रेसची अनेक ठिकाणी कोंडी केली आहे.

‘वंचित’च्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नुकताच एक ठराव घेऊन सुजात आंबेडकर यांना अमरावतीची उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. या ठरावात लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती लोकसभा हे वंचित बहुजन आघाडीला सुटत असल्यामुळे या जागेवर युवा नेते सुजात आंबेडकर यांनी लढावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ‘वंचित’च्या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर ‘वंचित’चे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीकडे ही मागणी केली आहे. महाविकास आघाडीत अमरावती लोकसभेवर ‘वंचित’ने दावा ठोकल्याने पुन्हा एकदा काँग्रेस गोटात धडकी भरली आहे. या ठरावावर जिल्हाभरातील कार्यकर्त्यांची स्वाक्षरी आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्‍ह्यात वंचित बहुजन आघाडीने आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा जागांवर निवडणूक लढविली होती. चार ठिकाणी ‘वंचित’चे उमेदवार हे तिसऱ्या स्‍थानी होते. धामणगाव रेल्‍वे मतदारसंघामध्‍ये काँग्रेसच्‍या उमेदवाराचा 9 हजार 519 मतांनी पराभव झाला होता. ‘वंचित’ फॅक्टर जिल्ह्यात काँग्रेससाठी धोकादायक ठरला होता. आता पुन्हा एकदा लोकसभा मतदारसंघात थेट आंबेडकर यांच्या मुलालाच उमेदवारी देण्याची मागणी केल्याने काँग्रेससह महाविकास आघाडीच्या गोटात कमालीचा शुकशुकाट पसरला आहे. येणाऱ्या काळात काय घडामोडी घडतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT