Kishore Gajbhiye Sarkarnama
विदर्भ

Ramtek Loksabha Constituency : 'वंचित'चा किशोर गजभियेंना पाठिंबा, रामटेकमध्ये चहांदेंनी घेतली माघार!

सरकारनामा ब्यूरो

Loksabha Election 2024 : रामटेक लोकसभा मतदारसंघात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना बुधवारी पाठिंबा जाहीर केला. येथील वंचितचे अधिकृत उमेदवार व भाजपचे बंडखोर शंकर चहांदे यांनी कौटुंबिक कारणावरून आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.

रामटेकमध्ये काँग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याने त्यांचा अर्ज बाद झाला होता. आता चहांदे यांनी माघार घेतली. रामटेकमध्ये सातत्याने नाट्यमय राजकीय घडत असल्याने मतदार बुचकळ्यात पडले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी 'वंचित'ने किशोर गजभिये(Kishore Gajbhiye) यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर चहांदे यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले होते. गजभिये हे काँग्रसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ते उमेदवारी मागे घेतील अशी शक्यता वर्तविली जात होती.

रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद झाल्यास आपल्या नावाचा विचार केला जाईल असे गजभिये यांना वाटत होते. हे बघून वंचितने त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिला होता असे समजते.

गजभिये मागील लोकसभेच्या निवडणुकीत रामटेकमधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. तत्पूर्वी उत्तर नागपूर विधानसभा मतदासंघातून त्यांनी बसपाच्या हत्तीवर निवडणूक लढवली होती. रामटेकमध्ये त्यांना सावनेरचे माजी आमदार व मंत्री सुनिल केदार(Sunil Kedar) यांनी विरोध दर्शवला होता. निवडणुकीत त्यांचे कामही केले नव्हते.

यावेळीसुद्धा त्यांच्या नावाला केदारांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे गजभिये यांनी बंडखोरी केली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक मतदारसंघात वंचितचा पाठिंबा मिळाल्याने काँग्रेसचा उमेदवार श्यामकुमार बर्वे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शंकर चहांदे यांनी कौटुंबिक कारणामुळे निवडणूक लढण्यास पक्षाकडे असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे आम्ही किशोर गजभिये यांना समर्थन दिल्याचे वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.

'मी वंचितचा अधिकृत उमेदवार होतो. प्रचाराही सुरू केला होता. मात्र तांत्रिक आणि कौटुंबिक कारणामुळे निवडणुकीतून माघार घेण्याचे ठरवले. माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. मी वंचितचे उमेदवार गजभिये यांचा प्रचार करणार आहे.' असं शंकर चहांदे म्हणाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT