Lok Sabha Election 2024 : किशोर गजभिये यांनी मुंबई येथे मंत्रालयात सामाजिक न्याय विभागात सचिव असताना 2010 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर ते राजकारणाकडे वळले. 2010 नंतर त्यांनी नागपूर जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांत स्वतःला झोकून दिले. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. त्यावेळी गजभिये यांचा 1 लाख 26 हजार 783 मतांनी पराभव झाला, पण त्यानंतरही ते थांबले नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर ते सातत्याने टीका-टिप्पणी करत आहेत. गेल्या पाच वर्षांत त्यांनी निवडणुकीची तयारी बऱ्यापैकी सुरू ठेवली आहे. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने शेतकरी आणि सामान्य लोकांच्या विरोधात राबवलेल्या धोरणांमुळे जनता काँग्रेसला साथ देईल, असा विश्वास व्यक्त करत ते आगामी लोकसभा निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत. (Latest Political News)
किशोर उत्तमराव गजभिये
19 मे 1957
बीई. (मेकॅनिकल), एमए. (व्हीएनआयटी), पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन (यूएसए), एलएलबी, आयएएस, आयईएस, आयपीएस (इंडियन पोस्टल सर्व्हिस)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
किशोर गजभिये यांचे आई, वडील हयात नाहीत. त्यांच्या पत्नी ज्योती या उच्चशिक्षित (एमए. हिंदी, एमएस्सी, एमफिल, पीएचडी) आहेत. त्या गृहउद्योग सांभाळतात. बचत गटांतील महिलांसाठी कारखाना उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दोन मुली आणि एक मुलगा असून, मोठी मुलगी दीक्षा डॉक्टर आहे. तिने बोस्टन विद्यापीठातून एमबीए केले आहे. दुसरी मुलगी सुमेधा हिने अमेरिकेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिने एमएस्सी (एज्युकेशन कौन्सिलिंग) केले आहे. मुलगा प्रियदर्शनचे शिक्षण सुरू आहे.
संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित आहे. त्यांना तीन भाऊ असून ते आपापल्या व्यवसायात आहेत. गजभिये यांचे कुटुंब मूळचे नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील तपनी गावाचे आहे. दुष्काळ पडल्याने त्यांचे खापर पणजोबा भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात वास्तव्यास गेले. त्यानंतर तेथेदेखील दुष्काळ पडल्याने ते अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेले. वडील शेतमजुरी सोडून नागपूर येथे आले आणि नागपूर येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षण नागपूर आणि वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण केले. त्यांचे वडील उत्तमराव गजभिये हे सुरुवातीपासून बहुजन समाज पार्टीशी जुळलेले होते. ते कांशीराम यांचे निकटवर्तीय होते.
सामाजिक न्याय विभागाचे सचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली
रामटेक
काँग्रेस
किशोर गजभिये यांनी 2014 मध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 20 हजार मतदान मिळाले होते. ऑक्टोबर 2014 मध्ये बहुजन समाज पार्टीतर्फे त्यांनी उत्तर नागपूर विधानसभेची निवडणूक लढवली. त्यात ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. रामटेक लोकसभा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने कॉंग्रेसने संधी दिली आणि 2019 मध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. त्यात गजभिये यांचा एक लाख 26 हजार 783 मतांनी पराभव झाला. त्यांची त्यांची लढत शिवसेनेचे कृपाल तुमाने यांच्याशी झाली. किशोर गजभिये दुसऱ्या क्रमांकावर राहिले. किशोर गजभिये यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे आंबेडकरी चळवळीतील बरेच मतदार कॉंग्रेसच्या बाजूने वळले. जिल्ह्यात दोन आमदार वाढले. पदवीधर मतदारसंघ आरएसएसच्या (संघ) ताब्यात होता. मात्र 57 वर्षांनंतर कॉंग्रेसचे अभिजित वंजारी निवडून आले. 20 वर्षांनंतर शिक्षक मतदारसंघातून कॉंग्रेसचे सुधाकर अडबाले निवडून आले. आंबेडकरी शिक्षक संघटनेची बरीचशी मते मिळाल्याने ते शक्य झाले.
किशोर गजभिये यांनी महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमची स्थापना केली असून, ते संस्थापक सदस्य आहेत. या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. 1927 मध्ये स्थापन झालेल्या समाज समता संघाचे राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. या संघाच्या शाखा दिल्लीसह संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. नवी मुंबई महापालिकेतील समाज समता कामगार संघ संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. सांस्कृतिक भवन, अंबाझरी बचाव कृती समितीचे ते मुख्य संयोजक आहेत. या विविध संघटनांच्या माध्यमांतून अनेक सामाजिक आणि कृतिशील कार्य केल्याची आणि करीत असल्याची त्यांची ओळख आहे. विविध आंदोलने, चळवळीच्या माध्यमातून त्यांनी मोठे सामाजिक काम उभे केले. चळवळीच्या माध्यमातून उपेक्षितांना न्याय आणि हक्क मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
किशोर गजभिये यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक रामटेक मतदारसंघातून लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला.
2019च्या निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातून किशोर गजभिये यांचा पराभव झाला. कारण 2019 मध्येसुद्धा 2014 प्रमाणे नरेंद्र मोदी यांची लाट होती. हे त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. याशिवाय कॉंग्रेसचे नेते एकसंघ नसणे, हेसुद्धा त्यांच्या पराभवामागील एक कारण आहे.
गेल्या चार वर्षांपासून मतदारसंघामध्ये फिरून ते जनतेच्या संपर्कात आहेत. विविध आंदोलने, प्रचार यंत्रणा राबवत आहेत. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीचा त्यांनी जोरदार प्रचार केला होता. त्यामुळेही त्यांचा जनसंपर्क वाढला आहे.
सोशल मीडियावरील व्हॉट्स अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यावर ते सक्रिय असतात. त्यांना सोशल मीडियावर आणखी बऱ्याचशा गोष्टी करता आल्या असत्या, मात्र त्यांची यंत्रणा तितकी तत्पर नाही.
वडील उत्तमराव गजभिये.
मागील 10 वर्षांत रामटेक लोकसभा मतदारसंघात कंपनी, प्रकल्पाची उभारणी झालेली नाही. खासदार कृपाल तुमाने ॲक्टिव्ह नसल्याची ओरड सातत्याने केली जाते. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस (Conress) जशी एकसंघ राहिली, तशीच येत्या लोकसभा निवडणुकीत राहण्याची शक्यता या वेळी वाढली आहे.
काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. 2014च्या निवडणुकीत एक लाखाच्या वर मतांनी पराभव झाला. गेल्या पाच वर्षांत प्रसिद्धीपासून ते लांब राहिले. सोशल मीडियावर पाहिजे त्या प्रमाणात ते सक्रिय नसतात.
रामटेक लोकसभा (Lok Sabha) मतदारसंगातून उमेदवारी नाही मिळाली तर किशोर गजभिये हे महाविकास आघाडीकडून ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी काम करतील, असे ते सांगतात. पण पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी देताना अन्याय केल्यास त्याला गजभिये नक्कीच विरोध करतील. योग्य उमेदवाराची निवड न झाल्यास पक्षाला त्याचे नुकसान होईल, हे पक्षश्रेष्ठींना समजावून सांगतील.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.