Ravikant Tupkar  Google
विदर्भ

Vidarbha Farmer's News : रविकांत तुपकर कडाडले; म्हणाले, 'त्यांच्या' हत्या करण्यासही मागेपुढे बघू नका !

Ravikant Tupkar News : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे स्फोटक विधान.

Atul Mehere

Nagpur Political News : ब्रिटिश सरकारला जागे करण्यासाठी व जनतेचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शहीद भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मोठा स्फोट घडवला होता. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आंधळ्या आणि बहिऱ्या झालेल्या सरकारला जागे करण्यासाठी आता अशाच एका मोठ्या स्फोटाची गरज आहे, असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले. (Explosive statement of farmer leader Ravikant Tupkar)

अजूनही शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. याला कारणीभूत सरकारचे चुकीचे धोरण आहे. शेतमालाला भावच मिळत नाही. त्यातही अस्मानी संकट ठेवलेलेच आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आत्मघातकी निर्णय घेतात, पण आता असे करून चालणार नाही. ज्यांनी तुम्हाला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. आता त्यांच्या हत्या करण्यासही मागेपुढे बघू नका, असे स्फोटक आव्हान तुपकरांनी शेतकऱ्यांना केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोणत्याही सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाहीत

नागपुरात बुधवारी (ता. २५) तुपकर म्हणाले की, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतीच्या मुद्द्यावर त्या भागातील लोकप्रतिनिधी एकत्र येऊन शेतकऱ्यांचे हित साधतात. विदर्भ, मराठवाड्यात तशी स्थिती नाही. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

विदर्भातील कापूस, सोयाबीन, संत्री, धान पिकवणाऱ्या अनेक शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. सातत्याने या विषयावर सरकारशी बोलणे सुरू होते. परंतु आतापर्यंत कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर हिताची निर्णय घेतलेले नाही.

विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, हमीभावाच्या मुद्द्यावरही शेतकरी अडचणीत आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतशिवाराचे नुकसान झालेले आहे, नियमित रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही परतावा मिळालेला नाही, असे अनेक मुद्दे उपस्थित करत तुपकर यांनी संताप व्यक्त केला.

जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक निर्णय घेणार नाही, तोपर्यंत आता आंदोलन थांबवण्यात येणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवत सर्व पक्षांतील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित या आंदोलनात सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहनही तुपकर यांनी केले. शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी सध्या ते २५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करीत आहेत.

पहिल्या टप्प्यातील हा दौरा आटोपल्यानंतर शेतकरीहिताशी संबंधित आंदोलनाची भूमिका ठरवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

त्यामुळे निराशेच्या गर्तेत असलेला शेतकरी आत्महत्या करण्याचा मार्ग पत्करत आहे. त्यामुळे आता जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय कोणावर नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही शेतकरी आंदोलनाचे प्रणेते रविकांत तुपकर यांनी दिला.

सर्व राजकीय पक्षांतील नेत्यांचे या आंदोलनामध्ये स्वागत आहे. आपल्या दौऱ्यादरम्यान आपण सर्व संघटनांशी व लोकप्रतिनिधींशी शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्द्यावर संवाद साधणार आहोत. त्यातून मोठी जनचळवळ उभारली जाईल, असा विश्वासही रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT