mahavikas Aaghadi .jpg Sarkarnama
विदर्भ

Mahavikas Aaghadi: विदर्भात महाविकास आघाडी फुटणार? काँग्रेसचा अनुभव वाईट म्हणत शरद पवारांच्या नेत्यानं दिले संकेत

Vidarbha News: महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने यासाठी डेडलाईन ठरवून दिली आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात सर्वच निवडणुका आटोपणार आहेत, असे असताना महाविकास आघाडीत काहीच हालचाली नाहीत.

Rajesh Charpe

Nagpur News: महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने यासाठी डेडलाईन ठरवून दिली आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात सर्वच निवडणुका आटोपणार आहेत, असे असताना महाविकास आघाडीत काहीच हालचाली नाहीत. याचदरम्यान,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) फुटण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीत आगामी स्थानिकच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावर कोणीच बोलत नाही. कोणाचा निरोपही नाही. हे बघता आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी समविचारी पक्षासोबत वेगळी आघाडी करतो असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी दिला. यावेळी त्यांनी यापूर्वी निवडणुकांमध्ये काँग्रेसने उमेदवार उभे करून आम्हाला धोका दिला होता, असे सांगून अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडी तुटण्याचेच संकेतही दिले.

कुंटे म्हणाले, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका लढविण्याची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढण्याची आमची इच्छा आहे. मात्र महाविकास आघाडीच्या इतर मित्र पक्षांकडून अद्यापही आघाडी संदर्भात चर्चा करण्यासाठी कोणताही निरोप नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

तसेच मागील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी आघाडी धर्म न पाळता आमच्या पक्षाच्या विरोधात काँग्रेसने अधिकृत उमेदवार उभे केले होते. काँग्रेसची आमच्यासोबत आघाडी करण्यासाठी तयारी नसेल तर आमची इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचा दावाही राष्ट्रवादीच्या (NCP) कुंटेंनी यावेळी केला.

स्थानिक निवडणुकांमध्ये मतांचे विभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून लढविण्यासाठी आम्ही आग्रही तसेच प्रयत्नशील आहोत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे काम करून आघाडीचा धर्म पाळला. त्यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकले. असे असले तरी मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आमचा अनुभव चांगला नसल्याचंही कुंटे म्हणाले.

मागील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ज्या विधानसभेत ज्या पक्षाचा आमदार आहे तेथे मित्र पक्षाला एक जिल्हा परिषद जागा देण्याचे ठरले होते. आम्ही तो निर्णय मान्य केला होता. मात्र काँग्रेसने त्यांच्या विधानसभा क्षेत्रात आमच्यासोबत दगा केला. आमच्याही विरोधात काँग्रेसने अधिकृत उमेदवार उभे केले होते. हे पुन्हा होऊ नये अशी आमची इच्छा आहे,असं विधान जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांनी केलं आहे.

राज्यात आणि केंद्रात भाजप महायुतीचे सरकार आहे. त्यांच्या विरोधात मोठा रोष आहे. केंद्र व राज्य पातळीवर भाजपच्या विरोधात इंडिया आघाडी एकत्रितपणे लढा देत आहे. या परिस्थिती भाजप विरोधात असलेली मते एकत्र राहणे गरजे आहे. असे असले तरी यापूर्वीच वाईट अनुभव लक्षात घेता आणि वेळेवर आघाडी करण्यास काँग्रेसने नकार दिला तर वेळेवर अडचण होऊ नये यासाठी समविचारी पक्षांसोबत बोलणी सुरू केली आहे. नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समीती सर्कलमधील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठकीचे सत्र सुरू आहे. आरक्षणानुसार सक्षम उमेदवार कोण राहील याची चाचपणी सुरू केली आहे असल्याचे प्रवीण कुंटे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT