Shishupal Patle sarkarnama
विदर्भ

Shishupal Patle: काँग्रेसमध्ये जाऊन शिशुपाल पटले यांनी पायावर धोंडा मारून घेतला?

राजेश चोरपे

Nagpur News: भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील आणखी एका नेत्याने भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने कार्यकर्त्यांना आता काही सुचेनासे झाले आहे. आता तरी नेमके काय चुकते आहे, याचा विचार संघटनेने कारावा, अशी मागणी केली जात आहे. आतापर्यंत एकूण चार नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून माजी खासदार शिशुपाल पटले (Shishupal Patle) हे सुद्धा काँग्रेसवासी झाले आहेत.

भंडारा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या हातून गेला. आता भंडारा (Bhandara)जिल्ह्यातील तीनही विधानसभा जिंकणे अवघड असल्याचे दिसून येते. त्यात एक एक नेता सोडून चालल्याने बेरजेऐवजी वजाबाकीच अधिक पक्षात सुरू झाली आहे.

तुमसर मतदारसंघात अजित पवार गटाचे राजू कारेमोरे आमदार आहेत. त्यामुळे येथे भाजपच्या इच्छुकाला काही स्कोप नाही. दुसरीकडे शरद पवार गटही या मतदारसंघावर दावा करणार असल्याने काँग्रेसलाही संधी मिळेल असे दिसत नाही. त्यामुळे शिशुपाल पटले यांनी काँग्रेसमध्ये जाऊन आपल्या पायावर धोंडा मारून घेतला, असे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.

शिशुपाल पटले यांनी माजी केंद्रीयमंत्री तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचा पराभव केला होता. ते भंडारा नगर परिषदेचे अध्यक्ष सुद्धा होते. पाच वर्षे खासदार राहूनही पटले यांना आपली लोकप्रियता, महत्त्व टिकवता आले नाही. पुढच्याच लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना आपले डिपाझिट सुद्धा वाचवता आले नाही. तेव्हापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते.

पक्षात कोणी विचारत नसल्याने ते नाराज होते. हीच नाराजी हेरून काँग्रेसने त्यांना आपलेसे केले. तुमसर विधानसभा मतदारसंघावर त्यांचा डोळा आहे. असे असले तरी येथील सध्याची राजकीय आणि जातीय परिस्थितीत बघता पटले यांचे पुनर्वसन अवघडच असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांच्या जाण्याने पोवार समाज भाजपपासून दुरावत चालला असल्याचे स्पष्ट होते.

यापूर्वी पोवार समाजाचे खुशाल बोपचे, माजी आमदार चरण वाघमारे, माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. एका युवा आणि बाहेरच्या नेत्याला भाजपने भंडारा-गोंदिया जिल्हा सोपवल्याने पक्षाचे मोठे नुकसान होत असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे पुर्नघटन झाल्यापासून पोवार समाजाचे वर्चस्व आणि अस्तित्व या मतदारसंघातून जवळपास संपले आहे. समाजाचा मोठा वर्ग आणि गावे गडचिरोली मतदारसंघात गेली आहेत. विरोधात असताना भाजपने अनेक समाजाला बांधून ठेवले होते. प्रत्येकाला शक्य असेल तेथे संधी दिली. समाजाचे नेते घडवले. आता मात्र सर्वच नाराज असल्याचे दिसून येते.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT