Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Nagpur : सरकारने नियुक्त्या करताना विचार करावा... असं का म्हणाले वडेट्टीवार?

Vijay Wadettiwar : पोलिस महासंचालकांच्या निवडीवर दिला सरकारला सल्ला

Atul Mehere

DGP Appointement : सरकारने कोणत्याही पदावर अधिकाऱ्याची नियुक्ती करताना त्यासंदर्भातील वस्तुस्थितीजन्य माहिती घेऊन निवड करावी, असा सल्ला काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी (ता. १) सरकारला दिला.

रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती होणार, असे ऐकत आहे. त्याबाबत आपण अधिक भाष्य करणार नाही. न्यायालयाने शुक्ला यांना ‘क्लीन चिट’ दिल्याची माहिती दिली जात आहे. अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सरकारने टाळायला हव्यात. एखाद्या अधिकाऱ्याबाबत आरोप-प्रत्यारोप होत असतील तर अशी नियुक्ती टाळलेली बरी, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

शिवसेनानेते संजय राऊत खरे बोलत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पैशांसाठी पाडण्यात आल्याच्या त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचेही वडेट्टीवार यांनी नमूद केले. त्यांच्या वक्तव्यातील एक शब्दही चुकीचा नाही, असे त्यांनी नमूद केले. महायुतीत वाद होतील, हे आपण अगोदरच सांगितले होते. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील अनेकांना ‘कमळ’ या चिन्हावर लढावे लागेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्यात फार मोठी अस्वस्थता आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत काहीच होणार नाही, परंतु नंतर खडाजंगी होईल, असेही ते म्हणाले.

नवीन वर्षात नवीन स्वप्न प्रत्येक जण बघत असतात. 2024 मध्ये कोणी कितीही स्वप्ने पाहिली तरी ‘इंडिया’ आघाडीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. जनतेमुळे हे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे त्यांनी नमूद केले. सध्या राज्यात ट्रीपल इंजिन सरकार आहे. ‘तीन तिघाडा, काम बिघाडा’ असे हे सरकार आहे. सरकारमध्ये लुटारू आणि डाकू आहेत. ते तिजोरीवर ठाण मांडून बसले आहेत. मात्र 2024 मध्ये मोठे परिवर्तन दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी काळात काँग्रेसची ताकद वाढणार आहे. राज्यातील सर्वात मोठा पक्ष काँग्रेस आहे. सर्वाधिक जागा जिंकण्याचा रेकॉर्डही काँग्रेस करेल. त्यामुळे भविष्यात काँग्रेसचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसेल, असे वडेट्टीवार ठामपणे म्हणाले. राम मंदिराच्या लोकार्पणासाठी वाटण्यात येणाऱ्या अक्षतांबाबत बोलताना ते म्हणाले की, राम हृदयात असले पाहिजेत. भाजप आणि संघासाठी राम हे राजकारणाचे साधन आहे. प्रभू रामचंद्रांचा बाजार त्यांनी मांडला आहे. अर्धवट मंदिराच्या उद्घाटनासाठी अक्षता वाटल्या जात आहेत. रामाच्या नावाने वेगळाच धंदा सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. रामाच्या नावाने दुकानदारी करणाऱ्यांना हनुमान शिक्षा करतील, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

Edited by : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT