Vijay Wadettiwar : पक्षामध्ये तिकीट मागण्याचा अधिकार पक्षात प्रत्येकालाच आहे. देण्याचा अधिकार हा हायकमांडचा आहे. हायकमांड जो निर्णय घेईल, तो अंतिम असेल. कोणत्याही परिस्थितीत पक्षाचे अहित होणार नाही, अशीच आमची भूमिका आहे. मागील लोकसभा निवडणुकीत माझी उमेदवारी निश्चित केल्यानंतरसुद्धा मीच होतकरू असणाऱ्या बाळू धानोरकर यांना समोर केलं. मी नेता होतो. त्यावेळेस त्यांना पक्षात आणून अहोरात्र काम केलं. भविष्यातही ज्याला तिकीट मिळेल त्यासाठीही तितकीच मेहनत करू, असे राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
नागपुरात आज (ता. 8) पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, राज्याचे स्क्रिनिंग 10 तारखेला होणार आहे. येत्या चार-पाच दिवसांत जागावाटपासंदर्भात निर्णय घेतला जाईल. तिन्ही पक्षांचा फॉर्म्युला ठरला आहे. वंचित बरोबर सीट शेअरिंगचा विषय आहे. त्यामध्ये समाधान होईल, अशी तयारी केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत महाविकास आघाडीतील चारही पक्षांचे एकमत आहे. संविधानाच्या संरक्षणासाठी सर्वांना एकत्र यावं लागेल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले अब्दुल सत्तार यांचाही वडेट्टीवारांनी समाचार घेतला. सध्या आठ दिवस त्यांना स्वप्नात राहू द्या. मग त्यांची जागा त्यांना कळेल, असे ते म्हणाले. राहुल गांधी वायनाळमधून खासदार आहेत. नरेंद्र मोदीसुद्धा दोन मतदारसंघांतून लढतात. त्यामुळे दोन ठिकाणी लढू नये, असा काही नियम नाही. याबाबत कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ठरवत असतात. वर्धा महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. काँग्रेसचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ती जागा काँग्रेसकडे राहावी, असा आग्रह आहे. तिन्ही पक्षांचे नेते त्यासंदर्भात निर्णय घेतील. त्यात काही अडचण जाणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना नगण्य स्थान आहे. दोन्ही पक्षांचे प्रमुख हे भाजपमध्ये जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे बेइमानी करून भाजपने पक्ष फोडले. ‘ऑपरेशन सक्सेस आणि पेशंट डेड’, असा तो फॉर्म्युला आहे. उद्या शिंदे गट आणि पवार गट या दोघांचाही अंत निश्चित आहे. यांच्या हातात मूग गिळून गप्प बसल्याशिवाय काही पर्याय नाही. भाजपवाले जे देतील तेच हे खातील, त्यांच्या दयेवर यांना जगावं लागणार आहे. भाजप कधीच प्रादेशिक पक्षाला मोठा होऊ देत नाही. भाजपने 35 नाही तर 40 जागाही लढवल्या तर त्यात नवल वाटण्यासारखं काही नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.