Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Abhishek Ghosalkar Case : मुंबई सुटलेल्या गोळीतून वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

Atul Mehere

Nagpur News : तीन पक्षांचे राज्यातील सरकार घोटाळेबाज आणि वसुली करणारे आहे. सरकारच्या नाकार्तेपणाचा परिपाक म्हणजे राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा बोजवारा उडाल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

मुंबईत अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या मुद्द्यावर ते नागपुरात बोलत होते. राज्यात गुंडाचा मुक्तसंचार सुरू आहे. सत्ताधाऱ्यांच्या सहभागातून हा गोळीबार झाला आहे. वर्चस्वाच्या वादातून खुनाचा कट रचण्यात आला होता. हे गहन षडयंत्र होते. कट करीत हत्या करण्यात आल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला.

घोसाळकरांच्या हत्येमागील कटात कोणी पुरुष आहे की महिला हे लवकरच कळेल. यासंदर्भात चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर सत्य पुढे येईल. पण त्यासाठी अत्यंत नि:पक्ष आणि निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. सत्ताधारी पक्षातील मोठ्या महिला किंवा पुरुषाचा हात या षडयंत्रात आहे काय, हे चौकशीतून समोर येणार आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. महाराष्ट्राची अवस्था सरकारने बिहार आणि उत्तर प्रदेशपेक्षा वाईट केली आहे, असा घणाघात त्यांनी केला. महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून सत्ता टिकवण्यासाठी नेते प्रयत्न करीत आहेत. सत्ता आणि संपत्तीसाठी सरकारी यंत्रणेचा वापर सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गृहमंत्र्यांना नाईलाज

महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अवस्था सध्या नाईलाजाची झाली आहे. फडणवीस अडकित्त्यातील सुपारीसारखे आहेत. सरकारमधील तीनही पक्षात सध्या शीतयुद्ध सुरू आहे. त्यामुळे गृहमंत्री हतबल आहेत. त्यामुळे राजकारणातील या गुन्हेगारीकरणामागे कोण आहे, ही नावे चौकशीतून पुढे आली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. एका प्रकरणात गृहमंत्री म्हणतात आरोपीला धरा दुसरे नेते म्हणतात सोडा, तिसरे म्हणतात कारवाई करा. त्यामुळे कोणातही एकवाक्यता दिसत नाही, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

राहुल यांची पाठराखण

राहुल गांधी बोलले हे वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात ओबीसी असलेला तेली समाज गुजरातमध्ये का नव्हता, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. तेली समाज ओबीसीत आला. पूर्वी हा समाज ओबीसीत नव्हता. ओबीसी महिलांच्या अब्रुवर हात घातला जात आहे. ओबीसींना वसतिगृह नाही. घरकूल नाही, हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना दिसत नाही का, असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

Karpuri Thakur

‘भारतरत्न’तूनही राजकारण

तीन जणांना भारतरत्न घोषित करण्यात आला आहे. बिहारचे कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न हा ओबीसी मतांवर डोळा ठेवून दिला आहे. सरकारने एका वर्षात चार ते पाच भरतरत्नाचे वाटप केले आहे. भारतरत्न पुरस्कारेच महत्त्व कमी करण्याचा हा प्रकार भाजप करीत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

आदित्य निवडणूक लढतील

खरी शिवसेना कोणाची याचे उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरे हे निवडणूक लढतील. खरी शिवसेना कोणाची आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ते स्पष्ट होईलच. जनता यांना धडा शिकवत खरी शिवसेना कोणाची आहे, हे दाखवून देईल, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT