Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Nagpur : राज्य सरकारला ‘चुल्लुभर’ पाण्यात बुडून मरायची वेळ.. कोण म्हणालं असं...

Devendra Fadnavis : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका

संदीप रायपूरे

Vijay Wadettiwar Statement : राज्याची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे. तरुणाई व्यसनाच्या खाईत लोटली जात आहे. एकीकडे राज्यातील बेरोजगारांची संख्या वाढत आहे. अशावेळी त्यांना आशादायी दिसणारे प्रकल्प गुजरातला पळविण्यात येत आहेत. राज्य सरकारला ‘चुल्लुभर’ पाण्यात बुडून मरायची वेळ आल्याचे यातून दिसते, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

नागपूर येथे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले. दस्तूरखुदद् मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच ‘रेव्ह पार्ट्यां’नी धुमाकुळ घातला आहे. हे राज्य ना तरुणासांठी सुरक्षित आहे, ना शेतकऱ्यांसाठी. मुंबईत असलेले ‘ड्रग्ज’ माफियांचे जाळे आता संपूर्ण राज्यभर पसरले आहे. ग्रामीण भागातही अनेकांना ‘ड्रग्ज’च्या व्यसनाने आपल्या विळख्यात घेतले आहे, असे ते म्हणाले.

राज्यात गुटखांबंदी आहे. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नाही. याचा परिणाम अतिशय गंभीर होत आहे. कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. तंबाखू तस्करांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. गावागावात मोठे तस्कर तयार झाले आहेत. हा कोट्यवधी रूपयांचा घोटाळा आहे. आता तर नकली तंबाखू विकणाऱ्यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. राज्यात सुरू असलेला हा गोरखधंदा मोठा आहे, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले.

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांची राज्याच्या प्रशासनावर पकड होती. ती आता पूर्णपणे संपली आहे. तंबाखूसह गुटख्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. गावागावात अशी परिस्थिती असताना राज्य सरकारला यावर तोडगा काढता आलेला नाही. राज्य सरकारचे हे मोठे अपयश असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे आपण राज्यासाठी काय केले, हे ओरडून सांगत आहेत, पण वास्तव्यात परिस्थिती उलट आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गुजरात म्हणजे संपूर्ण देश असे चित्र अलीकडच्या काळात केंद्र शासनाकडून रंगविले जात आहे. मुंबईतील अनेक मोठे उद्योग गुजरातकडे वळविण्यात आले आहेत. उद्योग गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर गेला आहे. ही अतिशय शरमेची बाब आहे. एकीकडे झपाट्याने राज्यातील उद्योग पळविले जात असताना, दुसरीकडे राज्यातील उद्योग कुठेच गेला नाही, असे ठामपणे सांगितले जात आहे. राज्य सरकारचा हा खोटारडेपणा आहे. ‘खोटे बोला, पण रेटून बोला’, अशी त्यांची कृती आहे. त्यामुळे या सरकारला सामान्यांचे काहीही देणेघेणे नाही, असेही काँग्रेस नेते वडेट्टीवार म्हणाले.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT