Vijay Wadettiwar. Sarkarnama
विदर्भ

Congress Step : वडेट्टीवारांचे ‘विजयदूत’ घराघरांत जात विचारणार ‘ऑल इज वेल ना?’

Vijay Wadettiwar : ब्रह्मपुरीत सुरू करण्यात आला काँग्रेसचा राज्यातील पहिला खास उपक्रम

संदीप रायपूरे

Bramhapuri : देशात लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार आहेत. यासाठी नेत्यांनी आपापल्या पद्धतीने तयारी सुरू केली आहे. भाजप, काँग्रेसच्या नेत्यांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे नेतृत्व करतात. वडेट्टीवार हेदेखील ‘फुल फार्म’मध्ये ‘बॅटिंग’ करीत आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघात ‘विजयदूत’ हा उपक्रम सुरू केला आहे.

वडेट्टीवारांचे ‘विजय’दूत आता घरोघरी जाऊन लोकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सज्ज झाले आहेत. विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांत विजयदूतांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच सावली येथे आयोजित एका कार्यक्रमात विजयदूतांना प्रशिक्षण देण्यात आले.

विजयदूतांना मार्गदर्शन करताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ग्रामीण भागातील विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी नागरिकांना विविध विभागांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. वारंवार चकरा मारूनही अधिकाऱ्यांची भेट न झाल्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड व नाहक त्रास सहन करावा लागतो. नागरिकांना जनकल्याणकारी योजनांपासून वंचित राहावे लागते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा, त्यांची पायपीट थांबावी व नागरिकांना जनसेवक लोकप्रतिनिधी म्हणून सेवा द्यावी, या हेतूने ब्रह्मपुरीत राज्यातील पहिला प्रयोग म्हणून विजयदूत ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. विजयदूत प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा ठरतील. विजयदूतांनी कर्तव्याप्रती आपली प्रामाणिकता व तळमळ कायम ठेवत नागरिकांच्या कामकाजाला हातभार लावावा. गावोगावी नागरिकांमध्ये शासन योजनांची जनजागृती करून, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले. मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा व समस्या लक्षात घेता माझ्या रूपानेच हा विजयदूत आपल्या दारी पोहोचेल व आपल्या समस्या सर्व मार्गी लावण्याचे कार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

चंद्रपूर जिल्ह्याला सुधीर मुनगंटीवार व विजय वडेट्टीवार यांच्या रूपाने दोन मोठे नेते लाभले आहेत. महायुतीची सत्ता असली की, मुनगंटीवार पालकमंत्री होतात. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास ही धुरा वडेट्टीवारांकडे येते. अशात चंद्रपुरात मुनगंटीवार विविध उपक्रम राबवित आहेत. आता विजय वडेट्टीवारदेखील विजयदूत उपक्रमाच्या माध्यमातून नवी संकल्पना व संपर्क यंत्रणा जिल्ह्यात राबविणार आहेत. लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. अशा वेळी आपल्या विजयासोबत पक्षाचे अनेक लोकप्रतिनिधी निवडून आपली शक्ती वाढविण्याचे आव्हान चंद्रपुरातील सर्व मोठ्या नेत्यांसमोर आहे. अशात ते आता पूर्ण ताकदीनिशी कामाला लागले आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT