Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
विदर्भ

Vikhe Patil News : पालकमंत्री लोकार्पण न करताच माघारी परतले, पण का ?

जयेश विनायकराव गावंडे

Vikhe Patil News : अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अकोला दौऱ्यावर असताना विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील 'बोलक्या रस्त्याचे' लोकार्पण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे करणार होते. मात्र ऐनवेळी पालकमंत्री माघारी परतल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

जेथे लोकार्पण होणार होते त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही कामगार कुटुंबीयांचे उपोषण सुरू आहे. आंदोलनकर्त्यांच्या रोष टाळण्यासाठी पालकमंत्री परत निघून गेल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तर पालकमंत्र्यांची प्रकृती चांगली नसल्याने ते लोकार्पण न करताच परत निघून गेल्याचा दावा भाजपने केला आहे. राज्याचे महसूल मंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे 10 व 11 फेब्रुवारी रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

या दौऱ्यात ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसोबतच जिल्ह्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 10 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री विखे पाटील हे अकोला दौऱ्यावर आले. त्यांनी अकोला जिल्ह्यातील विविध कार्यक्रम आणि लोकार्पण कार्यक्रमांना हजेरी लावली. असाच एक कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आला होता. अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या तसेच अकोला शहराचे सौंदर्यीकरण मुंबई आणि हैदराबादचे धर्तीवर . बोलका रस्त्याचे लोकार्पण रात्री पालकमंत्री यांच्या हस्ते होणार होते.

दरम्यान याच परिसरात गेल्या काही दिवसांपासून अकोल्यातील बिर्ला कॉलनीतील कामगार कुटुंबीयांसह उपोषणाला बसले आहेत. या कामगारांच्या 70 कुटुंबांना प्रशासनाने घरे सोडण्याची करण्याची नोटीस दिल्यावरून हे उपोषण सुरू आहे. अकोला ऑईल इंडस्ट्रीजची बिर्ला ऑईल मिल तीस वर्षांपूर्वीच बंद पडली. त्यामुळे 70 कामगारांची देणी थकल्याने या कामगारांचे कुटुंबीय मिलच्या जागेतच राहत होते. मात्र या कुटुंबांना घर खाली करण्याची नोटीस बजावल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते.

10 फेब्रुवारीला रात्री जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 'बोलके रस्ते या सौंदर्यीकरण प्रकल्पाचा उद्घाटन करण्यास आलेल्या पालकमंत्र्यांनी आपल्याला भेटावं, अशी मागणी आंदोलक कामगारांनी केली होती. मात्र, पालकमंत्री न भेटताच निघून गेल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सरकारविरोधात मोठा रोष व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना आंदोलनकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचला खरा, मात्र लोकार्पण न करताच निघून गेला. त्यामुळेच आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

..आणि म्हणून माघारी परतले पालकमंत्री, भाजपचा दावा!

दरम्यान पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मूर्तिजापूर येथे कार्यक्रम सुरू असताना 103 डिग्री ताप असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अकोल्यातील सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. मात्र तरीही आमदार रणधीर सावरकर यांच्या आग्रहाखातर अकोल्यातील हुतात्मा स्मारक येथे पालकमंत्र्यांनी वॉर टॅंक रणगाड्याचे लोकार्पण केले. मात्र त्यानंतरचे कार्यक्रम त्यांनी प्रकृतीच्या कारणामुळे रद्द केले, असा दावा जिल्हा भाजपकडून करण्यात आला आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT