Gadchiroli Youth during Sankalp Yatra. Sarkarnama
विदर्भ

Gadchiroli : अनखोडात विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली अन् एका युवकाने चक्क...

प्रसन्न जकाते

Ankhoda Village : अत्यंत दुर्गम भागात असलेला गडचिरोली जिल्हा नेहमीच माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे चर्चेत असतो. परंतु चामोर्शी तालुक्यातील अनखोडा नावाचे छोटेसे गाव त्यावेळी सर्वत्र चर्चेत आले, ज्यावेळी एका युवकाने विकसित भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रमच रोखला. ‘मोदी सरकार’ की ‘भारत सरकार’ असा या तरुणाचा आक्षेप होता.

विकसित भारत संकल्प यात्रा सध्या विदर्भात अनेक ठिकाणी फिरत आहे. अकोला जिल्ह्यातील रिधोरा गावात ही संकल्प यात्रा काही दिवसांपूर्वी रोखण्यात आली होती. यात्रेच्या रथावर ‘भारत सरकार’ ऐवजी ‘मोदी सरकार’ असा उल्लेख असल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप होता. त्यावरून ग्रामस्थांनी ही यात्रा रोखली होती. आता असाच प्रकार विदर्भातील शेवटचे टोक असलेल्या गडचिरोलीत घडला आहे.

‘मोदी सरकार’ असा स्पष्ट उल्लेख असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या अनखोडा या गावात पोहोचला. ग्रामस्थांनी यात्रेचे स्वागत केले. यात्रेसोबत असलेल्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाहीर कार्यक्रमांमधून सरकारी योजनेची माहिती देण्यास सुरुवात केली. अशातच सभेतून एक युवक व्यासपीठाजवळ आला. ‘भारत सरकार’ असा उल्लेख करायला हवा की ‘मोदी सरकार’ असा जाब या युवकाने अधिकाऱ्यांना विचारला.

बराच वेळपर्यंत हा युवक अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करीत होता. त्यामुळे अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाली. वेळ मारून नेण्यासाठी यात्रेसोबत असलेल्या अधिकाऱ्यांनी युवकाला आपण लेखी स्वरूपात माहितीच्या अधिकारात कोणताही प्रश्न विचारू शकता, असे उत्तर दिले. मात्र युवक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करीत त्याचा अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अधिकारी या युवकाला सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करीत होते, की ते शासकीय सेवक आहेत. सरकारकडून प्राप्त झालेल्या आदेशांचे ते पालन करीत आहेत. परंतु व्यासपीठासमोर या युवकाने आपल्या प्रश्नांचा भडीमार सुरूच ठेवला. अखेर अधिकाऱ्यांनी त्याची समजूत घालत त्याला खाली बसण्याची विनंती केली. युवक आणि यात्रेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या या प्रश्नोत्तराचा व्हिडीओ कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या अनेकांनी रेकॉर्ड केला. सोशल माध्यमांवर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

अकोल्यातील घटनेनंतर विदर्भात दुसऱ्यांदा गडचिरोली येथे सरकारची विकसित भारत संकल्प यात्रा रोखण्यात आल्याने शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. सरकारी यंत्रणेचा वापर करीत भाजप सातत्याने स्वत:च्या पक्षाचा प्रचार करीत असल्याचा आरोप होत आहे. गडचिरोलीत रोखण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे हा प्रकार दुसऱ्यांदा अधोरेखित झाला आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT