EVM Training Spot Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : ईव्हीएमचा ‘डेमो’ बंद पाडत गोजोरीच्या गावकऱ्यांनी सुनावले

संदीप रायपूरे

Chandrapur : ईव्हीएम यंत्रात घोळ करून निवडणूक जिंकल्या जात असल्याच्या आरोपावरून विरोधक सात्यत्याने आंदोलन करीत आहेत.

नुकताच दिल्ली येथील जंतरमंतरवर ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’चा नारा देण्यात आला. आता या आंदोलनाचे लोण गावागावात पसरले आहेत. प्रशासनाकडून ईव्हीएमचा ‘डेमो’ दाखविण्यासाठी आलेल्या कर्मचाी्यांना गावकऱ्यांनी हुसकावून लावले. ग्रामस्थांचा संताप पाहता कर्मचाऱ्यांना आपला ‘डेमो’ बंद करून परतावे लागले. चंद्रपूर जिल्ह्यातील गोजोली गावात हा प्रकार घडला. याप्रकाराची आता प्रशासकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.

लवकरच लोकसभा निवडणूक होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी आतापासूनच मोठी तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी एनडीए यावेळी चारशे जागांवर विजय मिळवेल, अशी गॅरेंटी नुकतीच लोकसभेत दिली. अशात लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडूनही तयारी सुरू झाली आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी नुकतीच यासंदर्भात बैठक घेतली. त्यांनी स्वत: चंद्रपूर आर्णी, वणी लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेतला.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ईव्हीएम जनजागृतीचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. ग्रामपंचायतस्तरावरील गावांमध्ये जात महसूल विभागाचे कर्मचारी ईव्हीएमचा ‘डेमो’ दाखवित आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली या गावात ही मंडळी पोहोचली. सोबत पोलिसही होते. कर्मचाऱ्यांनी ईव्हीएमचा डेमो दाखविण्याची तयारी सुरू केली. ‘डेमो’ बघण्यासाठी गावकऱ्यांनी बरीच गर्दी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आधीच ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचा मुद्दा देशभर गाजत आहे आहे. अशात उपस्थित गावकऱ्यांपैकी अनेकांनी ईव्हीएमचा ‘डेमो’ दाखवू नका, आम्हाला मूर्ख बनविण्याचे काम बंद करा, असे नमूद करीत कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. गोजोली येथील ईश्वर बारसागडे यांनी कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. बारसागडे यांनी यावेळी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान न घेता ‘बॅलेट पेपर’ची यंत्रणा मतदानासाठी कार्यान्वित करण्याची मागणी केली.

ईव्हीएमच्या ‘डेमो’ला होत असलेला प्रचंड विरोध पाहता कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेणे पसंत केले. प्रशासनाचे काम आहे. वरिष्ठांकडून आदेश आहेत, यामुळे आम्ही हे काम करीत आहोत, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतरही गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त करीत गोंधळ घातला. त्यामुळे ‘डेमो’ बंद करीत कर्मचारी माघारी फिरले.

विकसित भारत संकल्प यात्रेला भारत सरकारऐवजी मोदी सरकार हे नाव दिल्याने राज्यात अनेक ठिकाणी संताप व्यक्त करीत यात्रा रोखण्यात आली. आता नागरिक ईव्हीएमला घेत आक्रमक होताना दिसत आहेत. ईव्हीएममध्ये घोळ करण्यात येत असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करीत आहेत. अशात त्यांच्या आरोपांवर आता ग्रामस्थही विश्वास ठेवू लागले आहेत. अगदी लहान गावांमध्येही ईव्हीएमला विरोध सुरू होत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT